जळगाव : तालुक्यातील आव्हाणे, खेडी, वडनगरी या गावांमधील गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असून, मंगळवारी व बुधवारी पाऊस असतानादेखील मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता. महसूल प्रशासनाने अवैधरीत्या वाळूबाबत ग्रामपंचायतस्तरावर कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, ग्रामदक्षता समित्या या नावालाच ठरत आहेत. भरदिवसा गावामधून ट्रॅक्टर, डंपर ये-जा करत असतात.
घंटागाड्या येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या
जळगाव : शहरातील दैनंदिन साफसफाईचे काम वॉटरग्रेस कंपनीकडून केले जात असून, पावसाळ्यात मात्र या कंपनीकडून शहरातील स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरातील अनेक भागात घंटागाड्या येत नसल्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत. मात्र, मनपा प्रशासनाकडून याबाबत संबधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.
आव्हाणे येथील पिलीक देवाचे मंदिर पाण्याखाली
जळगाव - तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आव्हाणे येथील पिलीक देवाचे मंदिर पाण्याखाली गेले होते. या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास जागा नाही. यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
ममुराबाद येथे युवकांचा जागता पहारा
जळगाव - तालुक्यातील ममुराबाद येथे गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता गावातील युवक एकत्र आले आहेत. दररोज रात्री गावातील युवक जागता पहारा देत असून, पहारा देताना हातात काठ्यादेखील बाळगत आहेत. प्रत्येक गल्ली-बोळामध्ये युवक रात्री पहारा देत असून, यामुळे काही प्रमाणात चोरीच्या घटना बंद झाल्या आहेत. दरम्यान, पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.