जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत योजनेतंर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेच्या कामावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक मजूर लॉकडाऊन दरम्यान घरी परतल्यामुळे या दोन्ही योजनेचे काम जवळपास दीड ते दोन महिने बंदच होते. आता निर्बंध उठविले गेले असून, अनेक मजूर आता परतले आहेत. मात्र,अजूनही मजुरांची संख्या पुरेसी नसल्याने या दोन्ही योजनांचे काम संथगतीनेच सुरु आहे. या दोन्ही योजनांचे काम जितके लांबेल तितकेच रस्त्यांची कामे देखील लांबणार आहेत.
केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत मार्च २०१७ मध्ये या कामाला सुरुवात झाली होती. नोव्हेंबर २०१९ पर्यंत या योजनेचे काम होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदार, मनपा प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हे काम लांबतच गेले. त्यात कोरोनामुळे हे काम लांबले. आता पुन्हा या कामासाठी शासनाने ठेकेदाराला ६ महिन्यांची मुदतवाढ दिली असली तरी काम ३ महिन्यात पुर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, भुयारी गटार योजनेचे काम देखील संथगतीने सुरु असून, या योजनेचे काम पुर्ण करण्याची मुदत सप्टेंबर महिन्यापर्यंत आहे.
‘त्या’ वाढीव १६५ कॉलन्यांचा विषय अधांतरीतच
अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या निविदेत शहरातील राहून गेलेल्या १६५ कॉलन्यांचा समावेश मनपाने नव्याने केला आहे. तसेच या भागांमध्येही या योजनेतंर्गत पाणी मिळावे यासाठी ३० कोटी रुपयांच्या निधीला महासभेने मंजुरी देखील दिली आहे. मात्र, अजूनही मनपा प्रशासनाकडून या वाढीव कॉलन्यांमधील कामांसाठी पुढील प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. एकीकडे योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असताना, दुसरीकडे पुन्हा उर्वरित कामांना मनपाकडून उशीर केला जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. अनेक महिन्यांपासून १६५ कॉलन्यांमधील रखडलेला विषय स्कृटीनीसाठी पडून असून, अजूनही मंजूरीच्या प्रतीक्षेत आहे.
मलनिस्सारण प्रकल्पाचे काम मात्र वेगात
शहरात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम ६५ टक्के पुर्ण झाले असून, या कामावर कोरोनामुळे फरक पडला असला तरी , शिवाजीनगरातील जुन्या खत कारखान्यातील सुमारे १० एकर जागेवर तयार होणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पाचे काम मात्र वेगात सुरु आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे काम ७० टक्के पुर्ण झाले आहे. शहरातील सुमारे ४२ लाख लीटर वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर या प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे नदी, नाल्यांमध्ये वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर भविष्यात शेतीसाठी केला जाणार आहे. तसेच या पाण्याव्दारे मनपा प्रशासनाला उत्पन्नाचा नवा स्त्रोत देखील मिळणार आहे.
भुयारी गटार योजनेचे आतापर्यंत झालेले काम - ६५ टक्के
एकूण योजनेचा खर्च - १९५ कोटी
मुदत - सप्टेंबर २०२१
मक्तेदार - एल.सी.इन्फ्रास्ट्रक्चर, अहमदाबाद
जलवाहिण्या टाकण्याचे काम - २०३ किमी पैकी ११० किमी
---
पाणी पुरवठा योजनेचे झालेले काम - ९० टक्के
एकूण योजनेचा खर्च - २५० कोटी
मुदत - डिसेंबर २०२१
जलवाहिण्या टाकण्याचे काम - ९५ टक्के
पाण्यांच्या टाक्यांचे काम - ७० टक्के पुर्ण