लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वेगवेगळे उपवास व व्रत घेऊन आलेल्या श्रावण महिन्याला सुरुवात होऊन दोन आठवडे उलटले असले तरी यंदाच्या श्रावणात साबुदाण्याचा भाव ६० रुपये प्रतिकिलोवर स्थिर आहे. साबुदाण्यापेक्षा भगरकडे अनेकांचा कल वाढत असल्याने साबुदाणा स्थिर, तर भगरमध्ये किरकोळ वाढ होत आहे. दुसरीकडे शेंगदाण्याच्या भावात प्रतिकिलोला १० रुपये इतकी वाढ झाली आहे. यासोबतच खजूर, अंजीरलाही चांगली मागणी
असल्याचे सांगितले जात आहे.
श्रावण मास म्हटला म्हणजे विविध सण-उत्सव या महिन्यापासून सुरू होतात. त्यात श्रावण सोमवारसह गोकुळ अष्टमी व इतर वेगवेगळे उपवास या महिन्यात अनेक जण करतात. त्यामुळे श्रावण महिन्यात उपवासाच्या पदार्थांना मोठी मागणी वाढते. त्यानुसार यंदाही उपवासासाठी विविध पदार्थांना मागणी वाढली आहे. यात साबुदाण्यापेक्षा यंदा भगरकडे कल वाढल्याने साबुदाणा ६० रुपये प्रतिकिलोवर स्थिर आहे.
असे आहे दर (प्रतिकिलो)
पदार्थ-श्रावणाआधीचे दर-आताचे दर
साबुदाणा-६०-६०
शेंगदाणा-१०५-११५
भगर-१२०-१४०
आवक घटली, मागणी वाढली
भगर
-साबुदाण्यापेक्षा भगरला सध्या मागणी वाढली आहे. साबुदाणा पचायला जड असल्याने अनेक जण फराळात भगरचा समावेश करीत आहेत.
- भगर शिजवून खाता येतो. त्याशिवाय अनेकजण डोसे, इडली यांसारखे पदार्थदेखील करू लागल्याने उपवासाचा वेगळा मेनू म्हणून त्यांना पसंती वाढत आहे. यामुळे भगरला मागणी वाढून भगरचा भावही वाढत आहे.
शेंगदाणा
-एकतर पाऊस नाही व कोरोनामुळे आवकवर परिणाम या दोन्ही घटकांचा परिणाम होत आहे.
-श्रावण महिन्यात मागणी वाढली असताना मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने भाववाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.
साबुदाण्याचे दर स्थिर
उपवास म्हटला म्हणजे साबुदाणा हमखास वापरला जातो. मात्र, साबुदाणा हा पचायला जड असल्याने इतर पदार्थांना पसंती वाढत आहे. रात्रीच्या वेळी साबुदाणा खाल्ल्यास फिरणे होत नाही व शरीराची हालचाल न झाल्याने पचन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. साबुदाण्यामुळे अपचन, आम्लपित्त यांसारखा त्रास होऊ शकतो, असे आहारतज्ज्ञांचेही म्हणणे आहे. यामुळे मागणी कमी झाल्याने साबुदाण्याचे दर स्थिर आहेत.
भगरला वाढली मागणी
यंदाच्या श्रावण मासात साबुदाण्याचा दर स्थिर आहे. भगरला मागणी वाढली असून, तिच्या भावात जास्त वाढ नसली तरी काही दिवसांपासून थोडीफार वाढ होत आहे.
- सचिन बरडिया, व्यापारी.