२३ ते २६ ऑगस्ट दरम्यान घेणार विविध कार्यालयांचा आढावा : निधी विनियोगाचा घेणार आढावा : दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनपात तयारीला वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - महाराष्ट्र राज्य विधानमंडळातील तीन आमदारांची अंदाज समिती २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान जिल्हा दौऱ्यावर येत असून, समितीकडून शहरातील विविध शासकीय कार्यालयामध्ये जाऊन शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीच्या विनीयोगाबाबत आढावा घेतला जाणार आहे. या समितीमध्ये एकूण तीस आमदारांचा समावेश असून, या समितीच्या अध्यक्षस्थानी रणजित कांबळे हे राहणार आहेत.
३० सदस्यांचा या समितीमध्ये एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील यांचाही समावेश आहे. २३ रोजी या समितीच्या सदस्यांचे आगमन होणार असून, २४ रोजी जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयामधील विभागप्रमुखांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध प्रकल्प व योजनांच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणीदेखील करण्यात येणार आहे. २४ रोजी दुपारपासून ते २६ ऑगस्टपर्यंत महसूल प्रशासनासह, वन विभाग, महापालिका , जिल्हा परिषद, नगर परिषद, गृह विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विकास परिषद, जलसंपदा विभाग, पर्यटन विभाग, महावितरण, परिवहन, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह विविध शासकीय कार्यालयांमधील योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. या समितीच्या दौऱ्याचा पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत तयारीला वेग आला असून, बुधवारी सर्वच विभागप्रमुखांची बैठक घेण्यात आली.