लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या कोट्यवधीच्या जागा धूळखात पडल्या आहेत. मनपाने उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी तयारी सुरू केली असून, यासाठी महापालिकेने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करणार आहे.
मनपाचा मालमत्ता कराच्या रकमेव्यतिरिक्त उत्पन्नाचा इतर मोठा कोणताही स्रोत सध्या तरी नाही. त्यामुळे आता मनपा प्रशासनाने मालमत्ता कराच्या वसुलीच्या एकूण टक्केवारीत व इतर मालमत्तांच्या माध्यमातूनदेखील मनपाला उत्पन्न मिळावे यासाठी नियोजन तयार केले आहे. यासाठी अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या इतर कार्यालयीन कामाकाजाव्यतिरिक्त इतर कामकाजाची जबाबदारीदेखील देण्यात आली आहे.
टास्क फोर्सचे काय असेल काम?
१. मनपाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मनपाचे विद्यमान आर्थिक स्रोत अधिक बळकट करणे.
२. मनपामार्फत आकारण्यात येणाऱ्या विविध करांचा नियमितपणे आढावा घेणे.
३. मालमत्ता करासह इतर करांची वसुली १०० टक्के करण्यासाठी प्रयत्न करणे.
४. भाडेपट्ट्याने दिलेल्या मालमत्तांचा आढावा घेणे.
५. प्रत्येक प्रकारच्या वसुलीचे प्रमाण वाढविणे.
या टास्क फोर्समध्ये कोणाचा आहे समावेश?
मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांच्यासह मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे, विविध प्रभाग समितीचे अधिकारी, अतुल पाटील, समीर बोरोले, नरेंद्र जावळे, योगेश वाणी, गौरव सपकाळे, विजय हटकर, चेतन राणवे यांचा समावेश आहे.