लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : तालुक्यातील युरिया खताची कृत्रिम टंचाई दूर करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर दरवर्षीप्रमाणे जुलै-ऑगस्ट व रबी हंगामाच्या तोंडावर डिसेंबर, जानेवारीत दर वर्षाप्रमाणे रासायनिक खते मिळत नसल्याचे व शेतकऱ्यांनी रासायनिक खते मिळण्यासाठी वणवण भटकायचे, असे चित्र पारोळा तालुक्यात आजही दिसत आहे. शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया या रासायनिक खताची कृत्रिमरीत्या टंचाई करून शेतकऱ्यांनी युरिया बॅग मागितली असता त्यासोबत इतर बरेचशी खते कृषी दुकानदारांकडून देण्याचे बोलले जात आहे. याबाबत कृषी विभाग व कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल. येत्या आठ दिवसांत युरिया खताची कृत्रिम टंचाई दूर होऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेतकरी संघटनेकडून तीव्र आंदोलन सोडण्यात येईल, असे निवेदन नायब तहसीलदार पाडवी व कृषी विभागात शेतकरी संघटनेने व तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिले.
यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, प्रवक्ते प्रा. भिकनराव पाटील, शहर युवा अध्यक्ष नीलेश चौधरी, कायदेशीर सल्लागार ॲड. भूषण माने इतर पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.