धुळे : नकाणे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या शेख मोहसीन (वय १३) याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली. दरम्यान, एका मुलाला वाचविण्यात यश आले असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहरातील काझी प्लॉट परिसरातील शेख मोहसीन शेख सलिम (वय १३ ) व शाहिद अहमद मोहंमद कुर्बान हे रविवारची सुट्टी असल्यामुळे परिसरातील मित्रांसह दुपारी नकाणे तलावात पोहण्यासाठी गेले होते. तेथे गेल्यानंतर तीन जण बाहेर थांबले, तर शेख सलीम व शाहिद कुर्बान हे दोघे तलावात पोहण्यासाठी उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघे पाण्यात बुडू लागले. बाहेरील मित्रांनी हे पाहून आरडाओरड केली. त्यामुळे जवळपासचे पट्टीचे पोहणारे आले. त्यांनी शाहिद कुर्बानला वाचविले. शेख मोहसीन शेख सलिम याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. नंतर दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून शेख मोहसीन शेख सलिम याला मृत घोषित केले. शाहिदची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात मुलांच्या नातेवाइकांसह नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान, धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे काझी प्लॉट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाने तलावाला कुंपण करावे, अशी मागणी होत आहे.
----------
पाण्यासाठी दाहीदिशा..
महापालिकेच्या तापी योजनेच्या जलवाहिनीला नेहमीच गळती लागत असते. त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील पांझरा नदीच्या पुलाखालून महिलांना पाणी आणावे लागते.