वाहतूक कोंडी
जळगाव : बाजारपेठेत प्रचंड गर्दी होत असून, काही रस्त्यांवर नियमीत वाहतूक कोंडी होत आहे. गांधी मार्केटसमोर शनिवारी सायंकाळी असेच चित्र होते. अनेक अंतर्गत रस्त्यांवरही मोठमोठ्या वाहनांमुळे अन्य छोटी वाहने अडकत असल्याने वाहतुकीचे नियोजन व्हावे, अशी मागणी होत आहे.
वसतिगृहाची पाहणी
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रथम वर्षाची एकूण १५० विद्यार्थ्यांची बॅच येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांची खोटे नगरातील आल्हाद वसतिगृहात व्यवस्था करण्यात आली असून, या वसतिगृहाची अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शनिवारी पाहणी करून सूचना दिल्या.
भटक्या श्वानांची दहशत
जळगाव : शहरात भटक्या श्वानांची दहशत असून, दररोज सरासरी दहाजणांचा हे श्वान चावा घेत असल्याने भीतीचे वातावरण आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांवरुन हे समोर आले आहे. महापालिकेने याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
गेटपर्यंत दुकाने
जळगाव : भंगार बाजाराची दुकाने थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोर गेटपर्यंत लावली जात असून, यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रुग्णालयात येणारी वाहने यामुळे अडकत असल्याचे चित्र आहे. या रस्त्यावर शनिवारी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.