कोविड लसीकरण: दुसऱ्या डोससाठी आलेल्यांची निराशा
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद: विविध कारणांनी कोविड लसीकरण मोहिमेत आधीच अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असतांना, शासनाने लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी ४२ ते ५६ दिवसांच्या कालावधीची नवीन अट लागू केली आहे. या कारणाने परिसरातील धामणगाव आरोग्य केंद्रात गुरूवारी मोठा गोंधळ उडाला. अनेक नागरिकांना लस न घेताच निराश होऊन घरी परतावे लागले.
धामणगाव येथील आरोग्य केंद्रात सुरुवातीपासूनच ४५ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांना कोविड लसीकरण केले जात आहे. याठिकाणी अद्याप १८ ते ४५ वयोगटासाठी लसीकरण सुरूच झालेले नाही. साहजिक आरोग्य केंद्रात विशेषतः वयोवृद्धांची मोठी गर्दी होत असते. अर्थात, लसींचा अपूर्ण व अनियमित पुरवठा होत असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविताना संबंधित आरोग्य यंत्रणेची पुरती दमछाक होताना दिसते. एरव्ही सुमारे ५०० नागरिक रांगेत उभे असतांना या आरोग्य केंद्राला जेमतेम १०० ते १५० कोविड लसींचा पुरवठा होत असतो. परिणामी, अनेकांना सहा ते आठ तास ताटकळत उभे राहिल्यानंतरही लस मिळेल याची कोणतीच शाश्वती नसते. गुरुवारीसुद्धा नेहमीप्रमाणे १०० कोविशिल्ड लसींचा पुरवठा धामणगाव आरोग्य केंद्राला झाला होता. मात्र, सदर लस फक्त दुसरा डोस घेणे बाकी राहिलेल्या नागरिकांनाच दिली जाणार असल्याचा आदेश केंद्राला प्राप्त झाल्याने गर्दी थोडी आटोक्यात होती. तरीही आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणापूर्वीची नोंदणी सुरू केल्यावर गोंधळ झालाच. कारण, कोविन ऍपमध्ये पहिला डोस घेऊन ४२ ते ५६ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असेल तरच दुसऱ्या डोसची नोंदणी केली जात होती. पहिल्या डोसला महिना किंवा दोन महिने झालेल्या असंख्य नागरिकांची त्यामुळे नोंदणीच झाली नाही. संबंधितांनी त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून आरोग्य यंत्रणेला जाबदेखील विचारला. कोविन ऍपमधील नव्या बदलाविषयी अनभिज्ञ असलेल्या आरोग्य यंत्रणेचीही त्यामुळे मोठी तारांबळ उडाली.