जळगाव : अमळनेर तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाला असला तरी अनेक वर्षांपासून अमळनेर तालुका हा राज्यात अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. आगामी काळात दुष्काळग्रस्त तालुक्याचा कायापालट करून संपूर्ण तालुक्यात सिंचनाचे जाळे तयार करून सिंचनयुक्त तालुका म्हणून अमळनेरची ओळख तयार करण्याचा संकल्प अमळनेरचे नवनियुक्त आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केले.अनिल पाटील यांनी मंगळवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी अमळनेर तालुक्यातील मुख्य समस्या मार्गी लावण्यासाठी भविष्यात शासनाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच अमळनेर मतदारसंघात युवकांसाठी रोजगार वाढीसंदर्भातील व्हीजनबाबत देखील त्यांनी दिलखुलासपणे माहिती दिली.जनतेने डोक्यावर घेतलेली निवडणूकअमळनेर मतदारसंघाची यंदाची निवडणूक ही कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने प्रतिष्ठेची केली नव्हती. तर जनतेने ही निवडणूक प्रतिष्ठेची करत भूमीपुत्र व बाहेरचा उमेदवार अशीच लढत यावेळी रंगली आणि जनतेने माझ्यावर विश्वास दाखविल्याने मी ही लढाई जिंकली. त्यामुळे अमळनेरच्या जनतेचा मी आयुष्यभर ऋणी राहणार असल्याचे मत आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केले. अमळनेर शहरात मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो.बसस्थानक परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या छेडखानीचा देखील प्रयत्न होतो. त्यामुळे अशा घटना घडू नयेत म्हणून शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.जिल्ह्याला संजीवनी देणारा प्रकल्प पुर्ण करण्याचा प्रयत्नपाडळसरे येथील तापीनदीवरील प्रकल्प १९९९ पासून अपुर्णावस्थेत आहे. या प्रकल्पाबाबत अनेकांनी केवळ राजकारण केले. हा विषय केवळ भाषणापुरताच मर्यादित ठेवला. त्यामुळे जनतेने यंदा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणाºयावर विश्वास दाखवला आहे, तो विश्वास सार्थकी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही अनिल पाटील म्हणाले. तसेच माळण, बोरी, चिखली, पांझरा व तापी या नद्यांच्या माध्यमातून संपुर्ण तालुक्यात सिंचनाचे जाळे पसरवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.भाजपचे तीन नव्हे सात उमेदवार पराभूतविधानसभा निवडणुकीत सरकारविरूद्ध तीव्र नाराजी होती. जिल्ह्यात मुक्ताईनगर, रावेर व अमळनेर येथील उमेदवार पराभूत झाल्याचे सांगत असले तरी बंडखोर व भाजप उमेदवार असे सात उमेदवार पराभूत झाले आहेत. भाजपने शिवसेनेला नेहमी दुय्यम वागणूक दिली आहे. शिवसेनेच्या पुढील भवितव्यासाठी सध्याची त्यांची भूमिका योग्य आहे. भाजपने मुख्यमंत्रीपदाची पात्रता असणारे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना बाजूला सारले. त्यामुळे केवळ भाजपचेच नाही तर संपूर्ण खान्देशाचे नुकसान झाले आहे.जनतेच्या हितासाठी सर्वात जास्त वेळा निलंबित होणार आमदार राहीलराष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजयी होणारे आपण खान्देशातील एकमेव आमदार आहोत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण २४ तास उपलब्ध राहणार आहोत. एकटा आमदार असलो तरी जनतेच्या हितासाठी सर्वात जास्त वेळा निलंबित होणारा आमदार मी असेल असे त्यांनी सांगितले.शेतकºयांनी कृषी विभागाकडे अर्ज करावेअवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभाग आणि विमा कंपन्यांकडे कमी मनुष्यबळ आहे. त्यामुळे सर्वांच्या शेतात पंचनाम्यासाठी पोहचता येईलच असे नाही. त्यामुळे शेतकºयांनी कृषी विभागात एक पत्र देऊन शेतकºयाचे नाव, विमा भरल्याचा पुरावा सादर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.लघू उद्योगांना प्राधान्य देणारअमळनेर शहरालगत सुरु असलेल्या उद्योगांना अधिक सक्षम करून, लघू उद्योगांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहणार आहे. तसेच विप्रो चे प्रमुख अझीम प्रेमजी यांची भेट घेवून अमळनेरमधील त्यांचा प्रकल्प वाढविता कसा येईल याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच अमळनेर तालुक्यातील कपीलेश्वर, शहरातील मंगळग्रह मंदीराव्दारे पर्यटनाला कशी चालना मिळेल यासाठी व्हीजन आखण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
अवर्षणग्रस्त अमळनेर तालुका सिंचनयुक्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:31 IST