नशिराबाद : येथे तूप विकण्याचा बहाणा करून घरात शिरकाव करून त्यानंतर कुटुंबाला संमोहित करीत जेवणावर ताव मारीत घरातील रोख रकमेसह दागिन्यांचा ऐवज असा तब्बल एक लाख ९९ हजार रुपयांचा चुना लावला. गंडवून पसार झालेल्या त्या महिलेचे रेखाचित्र पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे. सदर महिला काठेवाडी वेशभूषा करून तूप विक्री करत होत्या. या ठिकाणी पुरुषोत्तम व पत्नी शकुंतला तेली या दाम्पत्याच्या घरात तूप विक्रीचा बहाणा करून रोख रक्कम व दागिने लंपास करून पोबारा केला. त्या वृद्ध दाम्पत्याने घरातील दागिने व रक्कम काढून देत त्या दोघी महिलांना रिक्षा स्टॉपपर्यंत सोडले. घरी आल्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या संदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून त्या महिलांचा शोध सुरू आहे. त्या महिलेचे रेखाचित्रसुद्धा पोलिसांनी जारी केले आहे. अशा वर्णनाची महिला आढळल्यास पोलिसांना कळवा, असे आवाहन करण्यात येत आहे.
नशिराबाद येथे संमोहित करणाऱ्या महिलेचे रेखाचित्र जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST