मतीन शेख/ ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर, दि.4 -मानव हा आपल्या बाबतीत काही प्रमाणात स्वार्थी असताना स्वत:वर प्रेम देखील करीत असतो. आपल्या बाह्य सौदर्याच्या निरीक्षणासाठी स्त्री अथवा पुरूष अनेकदा आरशासमोर स्वत:ला न्याहळत असतात. स्वत:वर प्रेम करण्याच्या या मानवी गुणधर्माची लागण मुक्ताईनगरातील चक्क एका गाढवाला झाली आहे. बाजारपेठेतील तीन दुकानाच्या दर्शनी भागात लावलेल्या आरशामध्ये एक गाढव काही दिवसांपासून आपली प्रतिमा पाहण्यासाठी नित्यनियमाने हजेरी लावत आहे. गाढवाच्या या प्रतापामुळे तिघे दुकानदार चांगलेच वैतागले असताना संपूर्ण मुक्ताईनगर शहरात मात्र करमुणकीचा विषय ठरत आहे.
समस्या कधी, केव्हा व कोणती येईल हे सांगता येत नाही. मुक्ताईनगर शहरातील हॉटेल श्री समोरील मोहित रेडियम, युनीनॉर गॅलरी, भन्साली मोबाईल शॉपी हे दुकानदार एका गाढवामुळे सध्या हैराण आहेत. गेल्या 5 दिवसापासून एक गाढव या दुकानांच्या दर्शनी बाजूस लावलेल्या काचेच्या मोहात पडले आहे. सकाळी दुकान उघडल्याबरोबर हे गाढव आपली प्रतिमा पाहण्यासाठी दुकानाजवळ दाखल होत असते. काचेत स्वत:ची प्रतिमा पाहिल्यानंतर ते काचाला खेटते नंतर जोरजोरात किंचाळते. एका दुकानदाराने त्याला हाकलले तर दुस:या दुकाना समोर जाऊन ते गाढव उभे राहते.
दुस:याने हाकलले तर परत पहिल्या दुकाना समोर असे चक्र सुरू आहे गाढवाला मारायला गेलेल्या दुकानदारावर हे गाढव मोठय़ाने किंचाळते. त्यामुळे दुकानदार त्याला मारण्याऐवजी माघारी परतत असतात. काही वेळेनंतर हे गाढव किंचाळत चौफुली भागात चक्कर मारून परत दुकाना समोर येत असते.
गाढवाच्या या प्रतापामुळे त्रस्त दुकानदारांनी शेवटी दुकानातील काचेवर कागद लावत गाढवापासून सुटका करण्याचा तात्पुरता प्रयत्न केला आहे. मात्र मोहित रेडियम या दुकानाच्या मालकाने काचेवरील कागद काढताच गाढव पुन्हा दुकान समोर हजर झाले. गाढवाचे आरसा प्रेम आणि दुकानदारांचा त्रास हा मुक्ताईनगर शहरात करमणुकीचा विषय ठरला आहे.