जळगाव : कुत्र्याने चावा घेतला, दोन महिने याकडे गांभीर्याने न पाहता दुर्लक्ष केल्याने शांताराम सिताराम कोळी (४२, रा.शिरसाळा, ता.बोदवड) या शेतकºयाचा बुधवारी सकाळी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात मृत्यू झाल्याची घटना घडली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम कोळी दोन महिन्यापूर्वी गावातून शेतात जात असताना कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतला होता. याकडे त्यांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही.दरम्यान मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांना असह्य त्रास होऊ लागला. त्यात उलट्या झाल्या. पाणी पिणेही अवघड होऊ लागले.प्रकृती बिघडल्याने कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना बुधवारी सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या अकस्मात मृत्यूने कुटुंबियांसह नातेवाईकांना जबर धक्का बसला.
कुत्र्याच्या चाव्याकडे दुर्लक्ष बेतले जीवावर.... दोन महिन्यानंतर शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 12:27 IST