लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाल, निमड्या, गारबर्डी, धरणपाडा या आदिवासीबहुल गावांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली. तसेच या परिसरातील लसीकरण केंद्र. पाल येथील ग्रामीण रुग्णालय आणि घरकुलांची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पाल रुग्णालयातील रुग्णांना मिळणारे उपचार, आरोग्य सुविधा, उपलब्ध मनुष्यबळ, औषधी आदिंची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांचेकडून जाणून घेतली. तर लसीकरण कक्षाची पाहणी करुन तेथील सोयीसुविधा, उपलब्ध लस, झालेले लसीकरण आदीबाबतची माहिती मुख्य अधिपरिचारिका कल्पना नगरे यांच्याकडून माहिती घेतली. लसीकरण कक्ष आणि तेथील व्यवस्था बघून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच जनजागृतीसाठी डॉ. बारेला यांनी तयार केलेल्या स्थानिक भाषेतील व्हिडिओ क्लिपचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील, डॉ. सचिन पाटील, डॉ. स्वप्नीशा पाटील, डॉ. मिलिंद जावळे उपस्थित होते.
गारबर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत आणि नरेगा अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांची पाहणी केली तसेच नरेगा अंतर्गत तयार केलेल्या रोपवाटिकेचीही पाहणी केली. तर निमड्या, गारबर्डी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत लाभार्थ्यांना वनपट्ट्यांचे आणि रेशनकार्डचे वाटपही जिल्हाधिकारी राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सुकी धरणपाडा येथे त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनादेखील केल्या.