अजय पाटील
जळगाव : जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम आता केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, राज्यातील बदललेल्या सत्तेच्या समीकरणानंतर ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी दरम्यान लढली जाण्याची शक्यता होती. मात्र, राज्यात एकमेकांशी भांडणारे जिल्ह्यातील सर्व नेते जिल्हा बँकेत एकत्र येण्याची शक्यता असून, या निवडणुकीत गेल्या वर्षाप्रमाणेच सर्वपक्षीय पॅनल तयार होणार असून, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची चाचपणी सुरु झाली आहे.
२०१५ मध्ये जिल्हा बँकेची निवडणूक ही बिनविरोध झाली होती. तेव्हा या निवडणुकीचे नेतृत्व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले होते; मात्र यावर्षी परिस्थिती बदलली आहे. माजी मंत्री खडसे व भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. त्यात खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत स्थायिक झाले आहेत. त्यात राज्यात देखील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यात भाजप पक्ष विरोधात आहे. राज्यातील हाच कित्ता जिल्हा बँकेच्या निवडणुकांमध्येही गिरवला जाईल अशी शक्यता होती. मात्र, २१ जागा लढणे कोणत्याही एका पक्षाला शक्य नसल्याने आता सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
डॉ. पाटील, गुलाबराव देवकर खडसेंच्या भेटीला
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पुढील मोर्चेबांधणीसाठी माजी मंत्री डॉ.सतीश पाटील व गुलाबराव देवकर यांनी मुंबईत मंगळवारी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सर्वपक्षीय पॅनल तयार करण्याबाबत चर्चा झाली असून, याबाबत खडसे यांनी देखील सकारात्मकता दर्शविली आहे. तसेच याबाबत स्थानिक नेत्यांशी चर्चा करून, पुढील जागा वाटपाबाबत देखील निर्णय घेण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकाच पक्षाला सर्व जागा लढणे शक्य नाही - गिरीश महाजन
जिल्हा बँकेची निवडणूक कोणत्याही एका पक्षाने लढविणे शक्य नाही. त्यामुळे या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल तयार करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच याबाबत भाजपच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांशी देखील चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ ला दिली. तसेच या निवडणुकीत जागा वाटपाबाबत देखील सकारात्मक निर्णय होणे गरजेचे आहे. आवश्यक जागा मिळाल्यास सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यावरच भर राहणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
शिवसेनेच्या आमदारांशी चर्चा करणार - संजय सावंत
जिल्हा बँक असो वा इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा सहभाग आतापर्यंत कमीच राहिला आहे; मात्र जिल्ह्यात शिवसेनेची वाढलेली राजकीय ताकद पाहता आता शिवसेनेकडून देखील जिल्हा बँकेत जोर लावण्यात येणार आहे. सर्वपक्षीय पॅनलबाबत शिवसेनेत अजूनही कोणतीही चर्चा नसली तरी याबाबत लवकरच सेनेच्या जिल्ह्यातील सर्व आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी ‘लोकमत’ ला दिली.