बांधकाम कामगारांच्या नोंदणीची चौकशीची मागणी
जळगाव : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात ऑफलाईन पद्धतीने बांधकाम कामगार व मजूर यांच्या नोंदणीमुळे शासनाची दिशाभूल करून, आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. तरी बांधकाम कामगारांच्या नोंदणीची चौकशीची मागणी करून, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जळगाव शहर युवा सेनेचे समन्वयक जितेंद्र बारी यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भगवान योगेश्वरांची दिंडी उत्साहात
जळगाव : मानवी अन्याय निवारण केंद्रातर्फे हभप श्रावण महाराज करंजकर यांच्या नेतृत्त्वाखाली भगवान योगेश्वर श्रीकृष्ण मूर्तीची वारकरी दिंडी उत्साहात काढण्यात आली. यावेळी मधुकर महाराज करंजीकर, जे. के. पाटील, रतन महाराज, जनाबाई खंडारे, आशाबाई मेढे, आशाबाई मिस्तरी, सुरेश मिस्तरी आदी वारकरी बांधव उपस्थित होते.
एसटी कर्मचारी गोपाळ पाटील यांचा सत्कार
जळगाव : एसटी महामंडळाच्या जळगाव आगारातील वाहक गोपाळ पाटील यांनी विविध लघुपट व गाण्यांच्या माध्यमातून कोरोनाकाळात एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले. याबद्दल त्यांचा विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी कला पथकातील पंडित पाटील व प्रवीण कुमावत यांचाही सत्कार करण्यात आला.