लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सभांमध्ये प्रश्न मांडून मांडून सदस्य थकतात, प्रत्येक सभेला इतिवृत्त काहीच असते तर त्याचा पूर्तता अहवाल हा वेगळाच असतो.
गेल्या चार वर्षात या सभांमधून काहीच साध्य न झाल्याने आता जि. प. च्या सभाच घेऊ नका, अशा शब्दात जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी तसेच विरोधी सदस्यांनी गुरुवारी संताप व्यक्त केला. स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी मेढाने केलेल्या कामांचा तसेच आरोग्य विभागाच्या पदोन्नत्यांचा विषय गाजला.
अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, आरोग्य सभापती रवींद्र पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे, शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, सदस्य नानाभाऊ महाजन, प्रताप पाटील, भाजप सदस्य मधुकर काटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे यांच्यासह विभागप्रमुख
उपस्थित होते. प्रत्येक सभेच्या इतिवृत्तात वेगळेच विषय असतात. अधिकारी मात्र पूर्तता अहवाल सादर करताना वेगळाच मुद्दा मांडतात.
सभा घेऊनही आता काहीच उपयोग होत नसल्याचा संताप सदस्यांनी व्यक्त केला. सभांना कसलेही अधिकार राहिलेले नसून जि. प. ची
यंत्रणा कोविडनंतर आता पोस्ट कोविडशी झगडतेय, असा टोला सदस्य नानाभाऊ महाजन यांनी लगावला आहे. दरम्यान, २० गाळे व दीड
एकर जागेत नवीन संकुल बांधून जि. प.ला उत्पन्नाचे स्रोत मिळेल, ही प्रक्रिया लवकर होण्यासाठी उपविभागीय अभियंता बांधकाम यांच्याकडे सर्व अधिकार द्यावेत, असे अधिकाऱ्यांनी सुचित केले.
सोलर यंत्रणेवर सावली, शाळा अंधारात
मेढा या एजन्सीकडून आधी विविध योजनांवर हातपंप बसविण्याची कामे करण्यात आली होती. यातील १५ पंप खराब तर ६ पंपाद्वारे कमी दाबाने पुरवठा होत असल्याने या कंपनीकडून कामे करू नये, जि. प.ने त्यांच्याच यंत्रणेकडून कामे करावी, असा ठराव दोन वर्षांपूर्वी झालेला असतानाही मेढाकडून जिल्ह्यातील २२६ शाळांवर सोलर यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच या यंत्रणा बसविण्यात
आल्या आहेत; मात्र यात दसनूर व मस्कावद या दोन शाळांवर तर या सोलर यंत्रणेवरच झाडांची सावली पडली असून, ती कार्यान्वियीत कशी होईल, अशी तक्रार सदस्य नानाभाऊ महाजन, मधुकर काटे यांनी मांडली. यावर येत्या सर्वसाधारण सभेपर्यंत सर्व २३६ यंत्रणांची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याची मागणी
यावेळी करण्यात आली. २३६ पैकी १५० शाळांमध्ये वीज जोडणीच नाही तेव्हा ही यंत्रणा काम कशी करणार, अशा असंख्य त्रुटी असताना ही
यंत्रणा बसविण्याची परवानगी देणारे व स्वीकारणे मुख्याध्यापक यांनाही निलंबित करावे, अशी मागणी सदस्यांनी केली.
पदोन्नत्यांसाठी आम्ही पैसे देतो - अमित देशमुख
आरोग्य विभागात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पदोन्न्त्या रखडल्या आहेत. संबंधित विभागांचे यात पॅकेज ठरलेले असून, जोपर्यंत पैसा येत नाही, तोपर्यंत पदोन्नत्या होणार नाहीत, असा गंभीर आरोप सदस्य अमित देशमुख यांनी केला व अखेर आम्ही सर्व सदस्य पैसे जमा करून तुम्हाला देतो, तेव्हा तरी पदोन्नत्या करा, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.