नंदुरबार : सण-उत्सवांच्या काळात भारनियमन न करण्याच्या सूचना असतानाही नंदुरबार शहरासह जिल्ह्यात तांत्रिक कारणांमळे सर्रास भारनियमन केले जात आहे. नंदुरबार शहरातील अनेक भागात सकाळी किंवा दुपारी तीन ते साडेतीन तास भारनियमन केले जात असल्यामुळे उत्सवावर विरजण पडत आहे. दरम्यान, ज्या भागात विजेची गळती आणि चोरी, तसेच थकबाकी आहे अशा भागातच तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा काही काळ बंद ठेवावा लागत असल्याचे वीज वितरण कंपनीचे म्हणणे आहे. सण-उत्सवांच्या काळात भारनियमन करू नये अशी मागणी जनतेने केली होती. त्याची दखल घेऊन शासनाने नवरात्रोत्सवात भारनियमन न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वीज पारेषण आणि वितरण कंपनीला सूचना देण्यात आल्या. त्यामुळे जनतेला हायसे वाटले. परंतु वीज वितरण कंपनीने आपल्या पद्धतीने कारभार सुरूच ठेवला आहे. भारनियमन नसतानाही शहरातील अनेक भागात अडीच ते साडेतीन तास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संतप्त भावना व्यक्त होत आहेत. आठ वीजवाहिन्या शहराला दरमहा सरासरी 50 लाख 39 हजार युनिट वीज लागते. सण-उत्सवांच्या काळात त्यात वाढ होऊन पाच ते सात हजार युनिट अतिरिक्त वीज लागते. सध्याची स्थिती पाहता तेवढी वीज उपलब्ध होत आहे. शहराला विविध भागातील आठ वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. यापैकी पाच वीजवाहिन्या ए, बी, सी व डी या ग्रुपमध्ये येतात. उर्वरित झराळी, नमस्कार कॉलनी व अर्बन वीजवाहिन्या या ई व एफ ग्रुपमध्ये येतात. एकूण वीज ग्राहक आणि उपलब्ध होणारी वीज लक्षात घेता फारशी तफावत नाही. त्यामुळे भारनियमन करण्याची गरज सध्या तरी नसल्याचे वीज वितरण कंपनीचे म्हणणे आहे. असे असतानाही तांत्रिक कारणांच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे नाराजी आहे. यंत्रणा कोलमडू नये म्हणून सध्या अडीच ते साडेतीन तास ज्या भागात वीजपुरवठा खंडित केला जातो ते भारनियमन नसून वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्यावर त्या- त्या भागातील वीजपुरवठा खंडित करावा लागतो. तसे केले नाही तर पुरवठय़ापेक्षा मागणी जास्त ही तफावत राहिल्यास राज्यभरातील यंत्रणा कोलमडण्याची शक्यता असते. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून जितक्या वेळ आणि फीडरनिहाय वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश येतात. त्यानुसार झोननुसार आणि ए, बी, सी, डी ग्रेडनुसार त्या-त्या फीडरवर वीजपुरवठा बंद करावा लागतो. कालावधी जास्त राहिल्यास एकापेक्षा जास्त फीडरवर तीन तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित करावा लागत असतो. त्यात ई, डी, सी, बी व ए या उलटय़ा क्रमाने वीजपुरवठा खंडित करावा लागतो. त्यातही ज्या भागात वीज गळती अधिक, चोरी अधिक आणि थकबाकी जास्त राहत असते अशा फीडरवर आधी वीजपुरवठा खंडित करावा लागतो. नाइलाज झालाच तर ए ग्रेडच्या फीडरवरही वीजपुरवठा बंद करावा लागत आहे. नागरिकांमध्ये नाराजी सण-उत्सवांच्या काळात तरी वीजपुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. परंतु शहरातील अनेक भागात सायंकाळच्या वेळीच वीजपुरवठा खंडित होत आहे. बुधवारी तर यात्रेत अनेक वेळा वीजपुरवठा खंडित झाला होता. असाच प्रकार गणेशोत्सवात विसजर्न मिरवणुकीच्या वेळी हरिहर भेट होत असतानाच वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता नवरात्रोत्सवातदेखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे नाराजी आहे. सायंकाळी व रात्रीच्या वेळी तरी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. '' भारनियमन सध्या बंद आहे. परंतु वरिष्ठ पातळीवरून वीजपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश आल्यास फीडरनिहाय वीजपुरवठा बंद करावा लागतो. ब:याच वेळा एकापेक्षा जास्त फीडरवर वीजपुरवठा बंद ठेवावा लागतो. त्यासाठी वेळेची मर्यादा नसते. तसे केले नाही तर राज्य पातळीवरील यंत्रणा विस्कळीत होण्याचा धोका असतो. सध्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा होत आहे. तूट किंवा टंचाई नाही. त्यामुळे वेळापत्रकाप्रमाणे भारनियमन होत नाही.'' -अनिल पाटील, कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, नंदुरबार.
भारनियमन नसतानाही वीज खंडित
By admin | Updated: October 17, 2015 00:18 IST