जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार २८ जुलैपासून ४ महिन्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज सुरु होणार आहे. दरम्यान, पुढील बुधवारपासून दिव्यांग बांधवांची गर्दी टाळण्यासाठी तसेच त्यांची होणारी गैरसोय दूर करण्याकरिता आता टोकन प्रणाली राबविली जाणार आहे.
अशी आहे प्रक्रिया
दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळ (www.swavlambancard.in) येथे जाऊन (Apply for Disability certificate & UDID card) या लिंकवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. तेथे प्रमाणपत्र नूतनीकरणचीदेखील (रिनिव्हल) लिंक उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट २ फोटो जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दर बुधवारी लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे. येथील प्रक्रिया झाल्यावर प्रमाणपत्र घरपोच तसेच पुढील आठ दिवसात (www.swavlambancard.in) या संकेतस्थळावरून प्रिंट काढून लाभार्थ्याला मिळू शकणार आहे.
अशी राहील टोकन प्रणाली
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कक्ष क्रमांक ११४ बी मध्ये वैद्यकीय अधिकारी कक्षात कर्मचारी उपस्थित असतात. आठवड्यातील सोमवार ते शनिवार असे सहा दिवस (शासकीय सुटी वगळता) मध्ये कधीही कार्यालयीन वेळेत दिव्यांग बांधव अथवा त्यांचे नातेवाईक यांनी संकेतस्थळावरील डाउनलोड केलेला फॉर्म व दिव्यांग बांधवाचे ओळखपत्र दाखवून टोकन प्राप्त करू शकतात. दर बुधवारी २०० दिव्यांगांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. एका व्यक्तीस एकच कुपन मिळेल.