मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी
जळगाव : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिक गावाकडे पुन्हा परतू लागले आहेत. विशेषतः उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातील नागरिक मोठ्या संख्येने गावाकडे जातांना दिसून येत आहेत. मुंबईकडून जळगाव मार्गे परप्रांतात जाणाऱ्या बहुतांश गाड्यांना गर्दी दिसून येत आहे.
विनामास्क प्रवाशांवर कारवाईची मागणी
जळगाव : सध्या कोरोनाचे दिवसेंदिवस रूग्ण वाढत असतानांही, जळगाव आगारात अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करतांना आढळून येत आहेत, यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी आगार प्रशासनाने या विनामास्क प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाईची मागणी
जळगाव : रेल्वे रूळ ओलांडणे कायद्याने गुन्हा असतानांही, अनेक प्रवासी बेकायदेशीरपणे रूळ ओलांडत आहेत. असे असतांना रेल्वे पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाईची मागणी होत आहे.
गटारींची स्वच्छता करण्याची मागणी
जळगाव : शहरातील अनेक भागात अनियमित साफसफाईमुळे होत असल्यामुळे गटारी तुंबल्या आहेत. परिणामी यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने शहरात स्वच्छता मोहिम राबविण्याची मागणी, नागरिकांमधुन केली जात आहे.
दुभाजक स्वच्छ करण्याची मागणी
जळगाव : शहरात उभारण्यात आलेल्या अनेक ठिकाणच्या दुभाजकांमध्ये मोठ्या प्रमाणावर काडी-कचरा साचला आहे. यामुळे झाडांची शोभाही कमी होत आहे. तरी मनपा प्रशासनाने शहरातील सर्व दुभाजकांची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे. तसेच येथील लहान झाडांना सध्या उन्हाळा असल्याने नियमित पाणी देण्याची मागणींही होत आहे.