जळगाव : एकीकडे कमी पावसामुळे शेतकरी अडचणीत असताना दुसरीकडे आता केळीच्या दरात २०० ते ३०० रुपयांची घट झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे एकीकडे इतर ठिकाणी केळीला मागणी वाढली असताना केळीच्या दरात घट करण्यात आल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. व्यापाऱ्यांनी हे दर कमी करण्याचे षडयंत्र असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
चिखल संपला धुळीची समस्या वाढली
जळगाव - गेल्या तीन दिवसांपासून आता पावसाने उसंत घेतली असल्याने रस्त्यांवर जळगावकरांना सामना करावा लागत असलेल्या चिखलाची समस्या कमी झाली आहे. मात्र, खराब रस्त्यांमुळे आता धुळीच्या समस्येने डोके वर काढले आहे. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धुळ पसरली असल्याने जळगावकर आता धुळीने त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात चिखल व पाऊस गेल्यावर धुळ अशा समस्या आता जळगावकरांना नेहमीच्या झाल्या आहेत.
मनपातील लिफ्ट बंद
जळगाव - महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये अडीच कोटी रुपये खर्च करून ६ लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. मात्र, काही महिन्यातच यापैकी अनेक लिफ्ट वारंवार बंद पडत आहेत. यामुळे महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दररोज मनपातील २ ते ३ लिफ्ट बंद पडत असल्याचेही समोर येत आहे.