अनधिकृत हॉकर्सला आणले होते वठणीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - महापालिकेचे डॅशिंग उपायुक्त म्हणून ओळखले जाणारे संतोष वाहुळे यांची बदली होऊन त्यांची मुंबईला अन्न नागरी पुरवठा विभागात उपसंचालकपदी नियुक्ती झाली आहे. वाहुळे हे महापालिकेत तीन वर्षांपूर्वी मुख्य लेखा परीक्षक म्हणून रुजू झाले होते. वाहुळे यांच्याकडे लेखा परीक्षकांसह उपायुक्तांचा पदभारदेखील देण्यात आल्यानंतर शहरातील अनधिकृत हॉकर्सला चांगलेच वठणीवर आणून शहरातील अतिक्रमणांचा मुख्य प्रश्न मार्गी लावला होता.
शहरातील अनधिकृत हॉकर्ससह अनधिकृत पक्के बांधकाम करणाऱ्यांसाठी संतोष वाहुळे यांचा दरारा होता. त्यामुळे शहरातील सुभाष चौक, बळीराम पेठ, ख्वॉजामीया चौक, फुले मार्केट परिसरात अनधिकृत हॉकर्सची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती, तसेच त्यांची काम करण्याची पद्धत पाहूनच, मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडील थकीत रक्कम वसूल करण्यासाठी मनपा आयुक्तांनी त्यांची खास नियुक्ती केली होती. गेल्या पंधरा दिवसांच्या काळातच वाहुळे यांनी मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून तब्बल ५ कोटी रुपयांची वसुली केली होती, तसेच कोरोनाच्या निर्बंध काळातही नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करून नागरिकांमध्ये शिस्त लावण्याचे काम वाहुळे यांनी केले होते. दरम्यान, त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नाही.