जिल्हा परिषदेंतर्गत सिंचन विभागामार्फत सन २०१९-२० मध्ये चिंचपुरे, ता. पाचोरा येथे बहुळा नदीवर गावालगत ५० लाख रुपये खर्चून सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता. या बंधाऱ्याच्या कामाची तांत्रिक मंजुरी गावापासून काही अंतरावर असताना चुकीच्या ठिकाणी गावालगतच रहिवासी घरांना बाधित होईल अशा नदीच्या वळणावर नियमबाह्य बंधारा बांधण्यात आला. बंधाऱ्याचे कामही निकृष्ट प्रतीचे झाल्याने गेल्या वर्षी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने बंधारा भरून पुराचे पाणी रहिवासी घरांकडे शिरून ४ रहिवाशांच्या घरांची पडझड झाली. घरातील भांडे व इतर सामान वाहून गेले. रहिवाशांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त रहिवाशांना सिंचन विभागाकडून नुकसानभरपाई जाहीर करूनही अद्याप मिळाली नाही. त्यातच हा बंधारा मंजूर जागेऐवजी अन्य ठिकाणी नदीच्या वळणावर बांधल्याने पुराचे पाणी मातीचा भराव तोडून गावात शिरले होते. त्यामुळे ५० लाख खर्चून बांधलेला सिमेंट बंधारा सिंचन विभागानेच जेसीबीच्या साहाय्याने तत्काळ तोडून टाकला. यामुळे ५० लाख रुपये पाण्यात गेले.
गावाला बंधाऱ्याचा लाभ तर झालाच नाही उलट गरीब गावकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या कामाची थातूरमातूर चौकशी करून सिंचन विभागानेच त्यांच्या संबंधित शाखा अभियंता अनिल पाटील व उपविभागीय अभियंता एस. एल. पाटील यांना वाचविण्याचा प्रयत्न करून शासनाच्या डोळ्यांत धूळफेक केली आहे, असा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे. अद्यापही नुकसानग्रस्त रहिवाशांना नुकसानभरपाई दिली नसून शासनाचे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. अखेर सिंचन विभागावरच बंधारा फोडण्याची नामुष्की आली. यात दोषी असणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारे कारवाई झाली नाही. याची कसून चौकशी करावी व संबंधितांवर वसुलीची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
280721\28jal_10_28072021_12.jpg
५० लाखाच्या बंधाऱ्याची वर्षभरातच लागली वाट