मोठ्या पावसाची गरज
केवळ रिमझिम पाऊस
हरताळा, ता. मुक्ताईनगर : हरताळे परिसरात मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या थोड्याफार रिमझिम पावसामुळे पिके तात्पुरती तरारली आहेत. मात्र परिसरात अद्यापही मोठा पाऊस न पडल्याने ओढे-नाले, पाझर तलावांमध्ये ठणठणाटच आहे. त्यामुळे विहिरींची पातळी अद्याप खालावलेली असल्याने परिसरात जोरदार पावसाची गरज आहे. हरताळ्यासह कोथळी, माळेगाव, सालबर्डी, निमखेडी, सारोळा यासह इतर गावांमध्ये ही परिस्थिती कायम आहे.
परिसरात खरिपाची पिके दुबार पेरणी करत एका महिन्याच्या विलंबाने सुरुवात झाली तर काही पिके करपायला लागली होती. मात्र रिमझिम पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले असले तरी अद्याप मोठा पाऊस न पडल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. परिसरात अधिक ठिकाणी नाल्यांवर बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांना पाणी आल्यानंतरच विहिरींची पाणी पातळी वाढते. सध्या सर्व नाले व बंधाऱ्यांसह पाझर तलावांमध्ये ठणठणाट असल्याने विहिरीही कोरड्याच आहेत.
गेल्यावर्षी याच ताडाच्या नाल्यावर २२ जुलै रोजी पूर आला होता व सर्व वाहतूक हरताळा गावचा रस्ता रहदारीसह बंद झाला होता व नागरिकांना पूर ओसरेपर्यंत ताटकळत उभे राहावे लागले होते. पाणी येताच नागरिकांची तारांबळ उडाली होती. यंदा केवळ रिमझिम रिपरिप पाऊस पडत आहे.
येथील केटीवेअर बंधाऱ्यावर पाट्या लावण्यात आल्या होत्या. परंतु त्याही नेस्तनाबूद झाल्याने पाणी थांबणार कसे हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
सध्या शेतकऱ्यांनी पिकांच्या आंतरमशागत तिचा वेग वाढविला आहे. शेतकरी निंदणी व कोळपणी, खत पेरणी, औषध फवारणी इत्यादी कामे करताना दिसत आहेत. दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
फोटो कॅप्शन
हरताळा परिसरातील ताडाच्या नाल्याजवळील असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यामध्ये अर्धावर जुलै संपला तरी ठणठणाट आहे. (छाया- चंद्रमणी इंगळे)
दुसरा फोटो
कापूस पिके कशी तरारली आहे; मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.