माधुरी बुधवारी पढावद येथून बसने थेट जळगावात आली. तेथून आव्हाणे येथे मुलींच्या भेटीसाठी गेली. तेथे त्यांची भेट होऊ न देता पती व सासरच्यांनी हाकलून लावल्याने माधुरीने तेथून थेट तालुका पोलीस ठाणे गाठले. तेथे पती व सासरच्यांविरुध्द तक्रार दिली. त्यावरुन अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली. याच तक्रारीवरुन पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी माधुरी हिची समजूत घातली व प्रेम नगरात राहत असलेल्या बहिणीचे पती कांतीलाल भगवान चौधरी (मुळ रा.एकलग्न, ता.धरणगाव) यांना बोलावले. त्यांच्यासोबत माधुरीला पाठविले. गुरुवारी माधुरी व तिचा पती राजेंद्र अशा दोघांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते, मात्र तत्पूर्वीच सकाळी माधुरीने रेल्वेखाली आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकरणी पती राजेंद्र दिलीप जाधव, सासरे दिलीप रामचंद्र जाधव, सासू संजूबाई दिलीप जाधव व जेठ चंद्रकांत दिलीप जाधव यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त व छळ केला म्हणून कलम ३०६, ४९८ अ, ५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कल्याण कासार तपास करीत आहेत.
गुन्हा दाखल झाल्यावरच घेतले प्रेत ताब्यात
माधुरी हिने आत्महत्या केल्याची घटना समजताच वडील रामचंद्र पवार, मुलगा श्रीकांत, मुलगी पूनम, मंगलाबाई व इतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठले. पती व सासु-सासऱ्यांच्या त्रासामुळेच मुलीने आत्महत्या केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा माहेरच्या लोकांनी घेतला. दुपारी चार वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर सायंकाळी शवविच्छेदन करुन मृतदेह ताब्यात घेऊन पढावद, ता.शिंदखेडा येथे नेण्यात आला.