लोकमत न्यूज नेटवर्क
यावल : तालुक्यातील चिंचोली येथील साठे पती-पत्नीचे बुधवारी दुर्दैवी निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघांच्या निधनात केवळ सात तासांचे अंतर राहिले.
चिंचोली येथील रहिवासी तथा पंचायत समितीचे माजी सदस्य गणपती भाऊराव साठे यांच्या पत्नी कोकिळाबाई (७०) यांचे २३ जूनला दुपारी दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांचे पती गणपती भाऊराव साठे (७५) यांनाही छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री अकरा वाजता गणपती साठे यांच्या निधनाचे वृत्त येऊन धडकले. तेव्हा चिंचोलीसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
गुरुवारी पती-पत्नीवर चिंचोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी अनेकांना अश्रू अनावर झाले. साठे कुटुंबीयांची प्रगतशील शेतकरी म्हणूनही परिसरात ओळख होती. त्यांच्या पश्चात सुनील साठे तर मन्यारखेडचे ग्रामसेवक अनिल साठे या मुलांसह दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.