लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यंदादेखील मान्सून सरासरी एवढा राहणार असल्याचा अंदाज असल्याने बळीराजा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. यावर्षी कापसाच्या लागवड क्षेत्रात पाच टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज असून, पाच लाख ३५ हजार क्षेत्रावर कपाशीची लागवड होऊ शकते. यासोबतच सोयाबीनच्या क्षेत्रातदेखील वाढ होण्याचा अंदाज आहे.
कृषी विभागाने खरीप हंगामासाठी पीक पेरणी, बी- बियाणे आणि खत नियोजन पूर्ण केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत चार ते पाच टक्के पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात खरिपाचे मुख्य पीक हे कापसाचे आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात पाच लाख २० हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. यंदा यात वाढ होऊन हे क्षेत्र पाच लाख ३४ हजार हेक्टरपर्यंत कपाशीची लागवड होण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यात यंदा ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने खरिपाच्या नियोजनात लागवडीखालील क्षेत्रात पाच टक्के वाढ केली आहे. खरिपासाठी गेल्या वर्षी सात लाख ७५ हजार ५५० हेक्टरमध्ये वाढ करून हे क्षेत्र यावर्षी सात लाख ७८ हजार ६०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे.
२६ लाखांवर कपाशी बियाणाची पाकिटे
जिल्ह्यात २६ लाख ५२ हजार ६०० पाकिटे कपाशी बियाणाचे नियोजन असून, १ लाख ३३ हजार मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे. शिवाय ११ हजार ९४५ मे. टन खतांचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे.
१६ भरारी पथकांची स्थापना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निविष्ठांची सुलभ वाहतूक आणि पुरवठा करण्यासाठी नियंत्रण कक्ष सक्रिय ठेवणे, बियाणे, खते व कीटकनाशके यांची गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणीचे तत्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यासोबतच जिल्हा स्तरावर एक व प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे एकूण १६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.