केंद्राकडे पाठविण्यात येणार अहवाल : अंमलबजावणीची मात्र प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात गेल्या दोन वर्षांमध्ये प्रदूषणाचा स्तर वाढला असून, यामध्ये वातावरणात धूलिकणांचे प्रमाण हे धोकादायक पातळीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या आठवड्यात केंद्र शासनाच्या समितीने शहरात पाहणी करून शहरात वाढलेल्या प्रदूषणाच्या स्तराबाबत नाराजी व्यक्त करून, मनपाला ॲक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मनपा प्रशासनाने शहरातील वाढत जाणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी त्रिसूत्री तयार करण्यात आली असून, याबाबतचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनपाने जरी ॲक्शन प्लॅन तयार केला असला, तरी मनपाकडून या ॲक्शन प्लॅनची अंमलबजावणी केव्हा होईल, याची प्रतीक्षा मात्र कायम आहे. जळगावकर गेल्या दोन वर्षांपासून धूळ, धूर आणि चिखलाने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत मनपा प्रशासन केवळ नावालाच ॲक्शन प्लॅन केंद्राकडे सादर करून, अंमलबजावणीपासून पळ तर काढणार नाही ना? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.
काय आहे ॲक्शन प्लॅन
१. शहरात धुळीचे प्रमाण खूप वाढल्याने शहराच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये परिणाम झाला आहे. धूलिकणांचे प्रमाण हे ६० टक्क्यांवरून ९० टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. यासाठी शहरातील खराब रस्तेच कारणीभूत असून, सप्टेंबर महिन्यानंतर शहरात नवीन डांबरी रस्ते तयार करून, ज्या ठिकाणी गरज आहे. त्याठिकाणी फुटपाथ तयार करण्याची संकल्पना मनपाकडून करण्यात आली आहे. तसेच काही उपनगरांमध्ये कॉंक्रिटच्या रस्त्याचेही नियोजन आहे.
२) जळगाव शहरात घाणीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर असल्याची तक्रार केंद्रीय पथकाने केली होती. यावरदेखील महानगरपालिकेने तोडगा काढायचे निश्चित केले आहे. ज्यामध्ये महापालिकेनुसार जळगाव शहरात आता घंटागाड्यांची संख्या वाढविली जाणार आहे. तसेच बंद असलेला घनकचरा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर धुराची समस्यादेखील मार्गी लावण्याची तयारी मनपाने केली आहे.
३) अमृत योजनेअंतर्गत शहरात २६ ठिकाणी ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आले असून, त्या ठिकाणी आधीच ४ ते ५ फुटांचे वृक्ष लावण्यात आले होते. येत्या वर्षभरात शहरातील अनेक भागात रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लावण्याची तयारी मनपाकडून करण्यात आली आहे. तसेच मोकळ्या जागेवर अजून ऑक्सिजन पार्कची संख्या वाढविण्यावर मनपाचा भर राहणार आहे.