पीआरसी कमिटीमुळे सर्वच कामाला लागले आहेत. तालुक्यात २७ ते २८ सप्टेंबर या कालावधीत तालुक्यात पीआरसी कमिटी येणार असल्याने सर्वच विभाग कामाला लागले आहेत. वर्षभरात असलेले कामकाज, आर्थिक व्यवहार यांची जुळवाजुळव करून सर्व रेकॉर्ड अद्ययावत करण्यासाठी सर्वच विभागांचे विभाग प्रमुख यांची दमछाक होत आहे.
यावर्षी पाऊस समाधानकारक असल्याने तालुक्यातील सर्वच प्रमुख प्रकल्प पूर्ण भरले आहेत. बोरी, इंदासी, म्हसवे, कंकराज, खोलसर, लोणी सिम आदी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असल्याने या प्रकल्पावर ज्या गावांची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. त्या गावांची पाणी टंचाई समस्या संपली आहे.
शहरात कोरोनाचे संकट संपले पण डेंग्यू, मलेरिया, सर्दी, खोकला या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ निर्माण झाली आहे. लहान मुलांचेही दवाखाने फुल्ल झाले आहेत.
पारोळा-अमळनेर रोडवर रस्त्यावर दुभाजकाचे काम सुरू आहे. पण रस्त्याचे रुंदीकरण न करता हे दुभाजक टाकण्याचे काम सुरू असल्याने अरुंद रस्त्यावर खराब साईडपट्ट्यांमुळे वाहनांचा पाटा तुटेल की काय, या भीतीने काळजीपूर्वक वाहने चालविली जात आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
गेल्या दहा वर्षांपासून आशिया महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू होते. पण गेल्या ४ महिन्यांपासून हे काम रखडल्याने आणखी किती वर्षे हे चौपदरीकरणाचे काम रखडून पडले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वार्तापत्र पारोळा