लोकमत न्यूज
जळगाव : कोरोना काळात नॉन कोविडचे अनेक आजारांच्या उपचारांमध्ये विलंब झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉन कोविड सेवा सुरू झाल्याने आता असे अनेक विविध विकारांचे रुग्ण समोर येत आहे. दरम्यान, यात मनोरुग्णांच्या ओपीडीवर परिणाम झाला आहे. यासह डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमरता यामुळे या विभागावरचा भार वाढत असल्याचे चित्र आहे.
एप्रिल महिन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविड सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर नॉन कोविडच्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था नव्हती. यावेळी नॉन कोविडचे सर्व विभाग डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वर्ग करण्यात आले होते. यात मनोरुग्ण विभागाचाही समावेश होता, अशी माहिती आहे. मात्र, कोविडच्या काळात खासगी रुग्णालयेही काही काळासाठी बंद असल्याने शिवाय नॉन कोविडची स्वतंत्र यंत्रणा नसल्याने अशा रुग्णांना या काळात मोठा त्रास सहन करावा लागला, अनेकांचा मानसिक आजार बळविल्याचे सांगितले जाते.
कोरोना आधीची मनोरुग्ण विभागाची ओपीडी - १५० ते २००
सद्यस्थितीत ओपीडी - ७० ते ८०
मनुष्यबळाचा मुद्दा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा मनोरुग्ण विभाग हा औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या अंतर्गत येत असतो. मात्र, या विभागात एकच डॉक्टर कार्यरत आहे. आता हळू हळू ओपीडी वाढत असून येत्या काही महिन्यात ती नियमीत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोट
कोरोना काळात सेवा न मिळाल्याने मनोरुग्णांचे आजार बळावले अशी काही प्रकरणे आपल्याकडे निदर्शनास आलेली नाही. मात्र, कोरोनामुळे भीती व नैराश्य अशा भावना रुग्णांमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. - डॉ. भाऊराव नाखले, विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभाग