चाळीसगाव : जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्र रूप धारण केले होते. यात आढळून आलेल्या बाधितांमध्ये बहुतांशी गळीत हंगामाहून गावी परतलेल्या ऊसतोड मजुरांचा समावेश होता. यावर्षी गावी परतलेले ऊसतोड मजूर कोरोना तपासणी न करताच आले असून यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होण्याचा अलर्ट ‘लोकमत’ने सविस्तर वृत्ताव्दारे दिला होता. यानंतर आरोग्य यंत्रणेने तांड्यांवरील ऊसतोड मजूर आणि नागरिकांचीही तपासणी सुरू केली आहे. यात ३२ मजूर कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील ४० हजारांहून अधिक ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात ऊसतोडीसाठी जातात. कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यानंतर ते एप्रिल व मे महिन्यात आपापल्या गावी परत येतात. गेल्यावर्षी मजुरांची साखर कारखान्यांनी कोरोना चाचणी केली होती. याबाबतचे प्रमाणपत्र देऊन त्यांना गावी जाण्यासाठी सोडले होते. यंदा मात्र हे मजूर तपासणी न करताच गावी परतले आहेत.
चौकट
....अन् प्रशासन झाले अलर्ट
दि. ६ जून रोजी खेर्डे व हातले तांडा येथे ३१ ऊसतोड मजूर कोरोनाबाधित आढळून आले. बाधितांची संख्या चांगलीच फुगू लागल्याने नऊ जून रोजी ‘लोकमत’ने ‘चाळीसगाव ठरतेय कोरोना हाॅटस्पाॅट’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करुन तपासणीविना गावी परतलेल्या ऊसतोड मजुरांचा प्रश्न मांडला होता. त्याची दखल घेऊन प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तहसीलदार अमोल मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी तातडीने ऊसतोड मजुरांच्या तांड्यांवर भेटी देणे सुरू केले. तांड्यांवरील मजूर व नागरिकांच्या टेस्टही सुरू केल्या. एकूण बाराशे मजूर व नागरिकांची तपासणी मंगळवारअखेर झाली आहे. यात ३२ जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
.........
चौकट
या तांड्यांवर झाली तपासणी
दरातांडा, सुंदरनगरतांडा, विसापूर, आंबेहोळ, तळोंदे प्र.चा., खेर्डे, सांगवी, बोढरे, हातले तांडा, कोंगानगर, मुंदखेडे खु., हिंगोणे सीम, जामडी, राजदेहरे तांडा, घोडेगाव, गोरखपूर तांडा, वलठाण तांडा आदी ठिकाणी बहुतांशी ऊसतोड मजूर व नागरिकांचीही आरोग्य विभागाच्या टीमकडून कोरोना चाचणी केली गेली.
...........
चौकट
तपासणी मोहीम सुरूच राहणार
बाहेरगावहून येणारे नागरिक, ऊसतोड मजुरांची तपासणी मोहीम पुढेही सुरूच राहणार आहे. नागरिकांनीदेखील याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत बाहेरगावहून येणाऱ्या ऊसतोड मजुरांची संख्या कमी झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत पुन्हा अशा मजूर व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी केली जाईल, अशी माहिती नंदकुमार वाळेकर व डॉ. देवराम लांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
===Photopath===
150621\15jal_8_15062021_12.jpg
===Caption===
पिंपरखेड येथे ऊसतोड मजुराची कोरोना चाचणी करताना आरोग्य विभागाची टीम. (छाया - जिजाबराव वाघ)