जामनेर : गेल्या वर्षाप्रमाणे यंदासुद्धा प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षण ऑनलाईन पद्धतीने होणार असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश शासनाकडून काढण्यात आले आहे. उन्हाळी सुटी संपताच विद्यार्थ्यांच्या हातात पुन्हा मोबाईल येणार असल्याने घराघरात पुन्हा ऑनलाईन शाळा सुरू होईल.
नवीन शैक्षणिक वर्ष मंगळवारपासून सुरू झाले. कोरोना संकटामुळे ना शाळा प्रवेशाचा सोहळा झाला, ना शाळेची पहिली घंटा वाजली. कोरोनाने विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील गोडवा व आनंदच हिरावून घेतला अशी स्थिती निर्माण झाली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी नवीन वह्या पुस्तके, दप्तर, गणवेश खरेदीसाठी पालकांकडे हट्ट करीत असत. कोरोनाची भीती अजूनही पालकांच्या मनात कायम असल्याने शासनदेखील शाळा महाविद्यालय सुरू करण्याच्या मनस्थितीत नाही.
शिक्षक ऑनलाईन शिकवित असल्याने विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल व समोर पालक असे चित्र घरोघरी पाहावयास मिळत आहे. ऑनलाईन प्रणालीला पालक कंटाळले असून, ग्रामीण भागात मोबाईलला रेंज मिळण्यात अडचण येते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील मुलांना महागड्या मोबाईलअभावी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.