लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून एकुण रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे फक्त जळगाव शहरातच सापडत होते. मात्र आता चाळीसगाव, जळगाव तालुका (शहर वगळता), चोपडा ही कोरोनाची नवी केंद्रे समोर आली आहे. जिल्ह्यात ४९२ नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरात मंगळवारी १२४, चोपड्यात ७३, चाळीसगावला ८० आणि जळगाव तालुक्यात ५३ नवे रुग्ण एकाच दिवसात समोर आले आहेत. या तालुक्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक दिसून आला आहे. तर दोघांचा मृत्यू झाला. ४०९० नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने रुग्णवाढ दिसून येत आहे. सोमवारी ३९६ नवे रुग्ण समोर आले होते. रविवारी हाच आकडा पाचशेच्या उंबरठ्यावर गेला आहे. गेल्या दोन अठवड्यांमध्ये दिवसभरात आढळून येणाऱ्या एकुण रुग्णसंख्येच्या ५० टक्के रुग्ण हे जळगाव शहरातच येत होते. मात्र मंगळवारी ४९२ पैकी फक्त १२४ रुग्ण हे शहरात आहेत. तर उरलेल्या रुग्णांमध्ये जळगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये ५३नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यासोबतच जामनेरला ३७ रुग्ण आहेत. अमळनेर, पाचोरा, भडगाव, यावल, बोदवड, पारोळा वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येने दुहेरी आकडा गाठला आहे.
१४४ जण कोरोनामुक्त
मंगळवारी जिल्हाभरात १४४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा हा ३१२५ झाले आहेत. तर भुसावळ तालुक्यातील ६१ वर्षांचा आणि चाळीसगाव तालुक्यातील ७९ वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
शासकीय कर्मचाऱ्याचा अहवाल सात दिवसानंतरही नाही
जिल्हाभरात कोरोना तपासणी प्रलंबीत अहवालांची संख्या ४ हजार ९० एवढी आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित अहवाल सातत्याने वाढत आहेत. जळगाव शहरातील एका शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा अहवाल सात दिवस झाले तरी आलेला नाही. या कर्मचाऱ्याला लक्षणे असल्याने त्यांनी व त्यांच्या संपुर्ण कुटुंबाने २४ फेब्रुवारी रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यलायात आपले नमुने दिले होते. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी विचारणा करून देखील अहवाल मिळालेले नाही.
कोट - शासकीय तपासणी लॅबची क्षमता ही १ हजार नमुने तपासण्याची आहे. आम्ही पुर्ण क्षमतेने तपासणी करत आहोत. पुढच्या काही दिवसात आरएनए एक्स्ट्रॅक्शन मशिनचे किट मिळाले की हीच क्षमता आणखी ३०० ने वाढेल. सध्या क्षमतेपेक्षा जास्त नमुने येत आहेत. तसेच काही तालुक्यांमध्ये नमुने घेतल्यावर ते एक दिवस ठेवले गेले. प्रलंबितता आणखी वाढते. - डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय