जळगाव : तालुक्यातील कुसुंबा शिवारातील एका शेतातून समाधीच्या मंदिरातील दगडी शिलेवर लावलेली ३० हजार रुपये किमतीची तांब्याची छत्री चोरट्याने चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी २३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर चार तासातच एमआयडीसी पोलिसांनी रामकृष्ण देवराम सैंदाणे (वव ३५,रा. रायपुर, ता. जळगाव) व श्रावण संजय आव्हाड (वय २८,रा. कुसुंबा, ता. जळगाव) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून छत्री हस्तगत करण्यात आली आहे.
कुसुंबा शिवारात यशवंत धनाजी पाटील यांच्या शेतात बोबडे बुवा महाराज यांची समाधी आहे. या समाधीच्या ठिकाणी गावकऱ्यांनी तांब्याची छत्री व दोन घंटा बसवलेल्या होत्या. गुरुवारी सकाळी ८ वाजता गावातील देवलाल पाटील, पंडित पाटील आणि सुनील पाटील हे सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता तेव्हा हा प्रकार उघडकीला आला. पोलिसात हे प्रकरण आल्यानंतर मंदिराच्या परिसरात गवत काढणाऱ्यांनीच छत्री चोरुन नेल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गफूर तडवी, इम्रान सय्यद, सतीश गर्जे, सिध्देश्वर डापकर व योगेश बारी यांनी रामकृष्ण व श्रावण या दोघांचा शोध घेतला. जंगलात लपविलेली छत्री त्यांनी काढून देत चोरीची कबुली दिली.