जळगाव : पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथे कुठल्याप्रकारची निविदा प्रक्रिया न राबविता नदीजवळ अंगणवाडीच्या नियोजित जागी भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकण्यात आला असून ही जागा बालकांसाठी अत्यंत धोकादायक आहे. याबाबतची चौकशी करून ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी सरपंच सुनिता मोरे यांच्यासह काहींनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना निवेदन दिले आहे.
१२ फेब्रुवारीला सरपंचाना कुठलीही सूचना न देता ग्रामसेवक सुनील पाटील, ठेकेदार गोपाल वाणी, कनिष्ठ अभियंता पी. बी. पाटील, सुपरवायझर विलास वाघ यांच्या मदतीने नदीजवळ भूमिपूजन करण्यात आले. यासह या ठिकाच्या पाच वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. खोदकाम सुरू असताना सेवानिवृत्त जवान वसंत सोनवणे यांनी विचारणा केली असता ठेकेदाराने उडवाडवीची उत्तरे दिली. २३ फेब्रुवारीला सरपंच सुनिता मोरे व काही सदस्यांनी अंगणवाडी बांधकामाच्या जागेची पाहणी केली असता माती मिक्स घेसू आढळून आलेली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अंगणवाडीच्या छतावरूनच विद्युत तारा जात असून पाण्याच्या नैसर्गिक प्रवाह ज्या ठिकाणाहून येतो, त्या ठिकाणी एका भितींचा पाय खोदण्यात आला आहे. निकृष्ट साहित्यामुळे मोठा अपघात होऊन बालकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामसेवकाने खोटी माहिती देऊन ग्रामपंचायतीची फसवणूक केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनावर सरपंच सुनिता मोरे, प्रतिभा पाटील, वसंत सोनवणे, अनिल पाटील, सुनंदा शेळके, वसंत महाले, मनोज पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.