जळगाव : पारोळा पोलीस ठाण्यात सलग दोन पोलीस अंमलदारांना लाच घेताना पकडण्यात आले. त्याचा ठपका ठेवून पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांची उचलबांगडी करुन त्यांना नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले. त्याआधी देखील पाळधी दूरक्षेत्राच्या अंमलदाराला लाच घेताना पकडण्यात आले. या प्रकरणात देखील तेथील प्रमुखाला नियंत्रण कक्षात हलविण्यात आले. दीड महिन्यात झालेल्या तीन घटनांनी ‘खाकी’ ची प्रतिमा नक्कीच डागाळली आहे. जेथे लाच घेणारा अंमलदार अडकला, तेथील प्रभारी अधिकाऱ्याची तेथून उचलबांगडी अपेक्षितच आहे, परंतु त्यामुळे खरच हा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल यानिमित्ताने विचारला जाऊ लागला आहे.
लाच घेणे, आणि लाच देणे दोन्ही प्रकार गुन्ह्यात मोडले जातात. लाचेच्या घटना टाळल्या जाव्या, भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणूनच लाच घेणारा जितका जबाबदार आहे, तितकाच लाच देऊन कामे करुन घेणारा तितकाच दोषी आहे. लाच देणाऱ्याविरुध्दही गुन्हा दाखल व्हावा असा कायदा सांगतो, परंतु जिल्ह्यात तरी लाच देणाऱ्याविरुध्द अजून तरी गुन्हा दाखल झालेला नाही. लाच मागण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यात शिपायापासून तर अगदी लाखाने पगार घेणारे वर्ग १ च्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात महिलाही मागे नसल्याचे कारवाईच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते.
मुळ काम सोडून पैशातच रस
पोलीस खात्यात आजही ९० टक्के अधिकारी, कर्मचारी अगदी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. दहा टक्के कर्मचारी मुळ काम सोडून पैशासाठी काम करीत असल्याचे दिसून येत आहेत. त्यात ८ टक्के कर्मचारी हे अवैध धंदे चालकांकडून वसुलीसाठी तर २ टक्के तपासात कागदीघोडे नाचवून नागरिकांना पैशासाठी जेरीस आणतात, हे वास्तव आहे. या दहा टक्के लोकांमुळे ९० टक्के प्रामाणिक काम करणारी यंत्रणाही बदनाम होत आहे. काही कर्मचारी तर खाकीतील गुन्हेगार बनल्याचे उदाहरणे असून एका कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकण्यात आले आहे तर अजूनही असे काही कर्मचारी खात्यात कार्यरत आहेत. पैशांच्या लालसेमुळे अधिकारीही या प्रकाराकडे दुर्लक्ष करायला लागले आहेत.
अंतर्गत राजकारणच प्रमुख कारण
गेल्या सव्वा वर्षात पोलीस खात्यातील आठ जणांवर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली. त्यात एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. २०२० मध्ये पाच तर चालू महिनाभरात तीन जणांचा समावेश आहे. पारोळ्यातील दोन्ही कारवाया बाहेर जिल्ह्यातील एसीबीने केल्या. लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समर्थन होऊच शकत नाही, परंतु त्यातील बहुतांश प्रकरणात खात्यातील अंतर्गत राजकारण याला कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे. आपल्याच माणसाला आपल्याच माणसांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून संपविल्याचे काही प्रकरणात उघड झाले होते.