लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडच्या काळात नियुक्त करण्यात आलेल्या डाटा एंट्री ऑपरेटर आणि परिचारिकांची मुदत ३१ जानेवारी रोजी संपल्यानंतर १ फेब्रुवारीला दिवसभर या कर्मचाऱ्यांनी संभ्रमात काम केले. मात्र, सायंकाळी पुन्हा महिनाभर मुदतवाढीचे पत्र या कर्मचाऱ्यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे लसीकरणात कर्मचाऱ्यांचा अभावाचे संकट तात्पुरते टळल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात एनआरएचएम अंतर्गत विविध पदांवर २५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर महिन्यात यातील अनेकांना कार्यमुक्त करण्यात आले होते. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास काही ठिकाणी या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. टप्या टप्याने अनेक कर्मचार्यांना रुजू करुन घेण्यात आले होते. यातील डाटा एंट्री ऑपरेटर व कोरोना लसीकरण मोहीमेत डाटा अपलोड करणे, कागदपत्र प्रमाणीत करणे, ॲपवर कार्यवाही करणे आदी बाबींची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांची ३१ रोजी मुदत संपल्यामुळे अनेक परिचारिका या १ रोजी कामावरच गेल्या नव्हत्या. मात्र, दिवसभरात ऑर्डर येईल, या अपेक्षेने काही कर्मचारी कामावर रुजू झाले होते. मात्र, दिवसभर ऑर्डर नसल्याने संभ्रमातच त्यांनी काम केले. अखेर सायंकाळी या कर्मचाऱ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.