चाळीसगाव ते चोपडा या मार्गावर भडगाव, एरंडोल व धरणगावनंतर सर्वात मोठे गाव कासोदा हे आहे. चोपडा येथून दररोज तीन वेळा कासोदामार्गे चाळीसगाव ही बस धावते. कासोदा येथील बस स्थानक बायपास रस्त्यापासून १०० मीटर अंतरावर आहे. काही वाहन चालक हे कासोदा बस स्थानकात न जाता बायपास निघून जातात. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोईकरिता बिर्ला चौक येथे बस स्थानक परिसर निश्चित केला आहे, त्यामुळे प्रवासी येथील बिर्ला चौकात बसची वाट पाहत थांबलेले असतात.
निर्धारित वेळेवर बस न आल्याने, प्रवाशांनी भडगाव अथवा एरंडोल आगारात या बसबाबत चौकशी केल्यावर कळते की, बस वेळेवर होती व बायपासने निघून गेली. यावेळी चोपडा अथवा चाळीसगाव येथे जाणाऱ्या प्रवाशांना खूपच मनस्ताप सहन करावा लागतो. कारण टप्प्याने न जाता सरळ चोपडा अथवा चाळीसगावला जाण्यासाठी ही बस खूपच महत्त्वाची असते. ज्येष्ठ नागरिक तर याच बसची वाट पाहत थांबलेले असतात. गाडी बायपासने निघून गेल्याने खूपच संताप व्यक्त होत असतो.
आगाराकडे तक्रार
एरंडोल बसडेपोत याबाबत तक्रार केल्यानंतर, त्यांनीही चोपडा आगाराचे चालक दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. अनेक वेळा सूचना करूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे, असे सांगण्यात आले. यात एसटी महामंडळाचेही नुकसान होत असल्याने, याची गंभीर दखल घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.