तालुक्यातील धानोरा-भोरटेक ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पूर्वा अमोल राजपूत आणि त्यांचे पती अमोल इंद्रसिंग राजपूत हे उपसरपंचपदाचा दुरुपयोग करत आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या अर्थात गावाच्या मालकीच्या सार्वजनिक संसाधनाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहेत. ते ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार करूनही बीडीओंसह ग्रामसेवकही दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
याबत ग्रामस्थ जितेंद्र राजपूत यांनी गटविकास अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,उपसरपंच आणि त्यांचे पती हे भोरटेक गावातील पाझर तलावालगत असलेल्या गावविहिरीवरील पाण्याचा स्वतःच्या बागायती शेतीसाठी वापर करत आहेत. या विहिरीवरील साडेसात हॉर्स पॉवर क्षमतेचा विद्युत पाणीपंप त्यांनी आपल्या खासगी मालकीच्या शेतातील विहिरीत बसवला आहे. गावविहिरीवरील वीज कनेक्शनचा वापर ते स्वतःच्या शेतातील खासगी विहिरीसाठी करतात. ग्रामपंचायतीच्या संसाधनांचा ते वापर तर करतच असून त्यासोबत वीजचोरीसुद्धा करत आहेत. तसेच भोरटेक ग्रामस्थांना पाण्याच्या सुविधेपासून वंचित ठेवत आहेत. त्यामुळे या प्रकाराला गांभीर्याने घेत आपण उचित कार्यवाही करावी. अन्यथा न्यायासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषणाचा मार्ग अवलंबविण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
----
कोट
संबंधित ग्रामविस्तार अधिकाऱ्यास पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने योग्य ती कारवाई निश्चित होईल . मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या तक्रारी व अत्यावश्यक कामांचा रोज करावयाचा निपटारा, तुलनेत कमी मनुष्यबळ यामुळे कारवाईसाठी थोडा वेळ लागणे अपरिहार्य आहे. याचा अर्थ आमचे तक्रारींकडे दुर्लक्ष आहे असा होत नाही .
-संदीप वायाळ
गटविकास अधिकारी, अमळनेर
----
तक्रारदारांनी राजकीय व वैयक्तिक द्वेषातून धादांत खोटे आरोप केलेले आहेत. आम्ही सत्तेचा कोणताही गैरवापर केलेला नाही. उलट ग्रामस्थांना आमचे खासगी पाणी दिले आहे. शासकीय चौकशीतून सत्य समोर येईलच.
अमोल राजपूत,
भोरटेक