भुसावळ : रेल्वेच्या तिसऱ्या लाईनच्या पुलाखालील काम गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी झाले, परंतु ते काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येत आहे. येथील मामाजी टॉकीज रोडवरील रेल्वेच्या दगडी पुलाखालील हे चित्र आहे.
सूत्रांनुसार, भुसावळ शहरातून जाणारा एकमेव मोठा नाला हा जाममोहल्ला ते मामाजी टॉकीजपर्यंत वाहतो. या नाल्यावर रेल्वेने मामाजी टॉकीज रोडवर दगडी पूल बनवला आहे.
काही वर्षांपूर्वी रेल्वेने तिसऱ्या लाईनच्या कामासाठी या नाल्यात मोठमोठे पिलर उभे केले आहे. मात्र, या पिलरखाली जो रस्ता बनवला आहे, त्याची अवस्था अगदी बिकट झाली आहे. या रस्त्यावरून लहान-मोठी शेकडो वाहने ये-जा करत असतात; पण रस्ता बनवण्यासाठी रेल्वेने नाल्यावर जो स्लॅब टाकला आहे, त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे बोलले जात आहे.
या रस्त्यावरील स्लॅबच्या आसाऱ्या बाहेर आल्या आहेत. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्याने हे खड्डे भरले तर दिसतही नाहीत. रस्त्यावर बाहेर आलेल्या त्या आसाऱ्याच्या पिंजऱ्यात अडकून बरेच वाहनधारक पडले आहेत. त्यामुळे काहींचे हातपाय फ्रॅक्चर झाले आहे. त्या आसाऱ्यांमध्ये अडकून अपघात होऊन कोणाचा जीव गेला तर त्यास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील व असा खराब काँक्रीटचा रस्ता बनवणाऱ्या ठेकेदारावर रेल्वेने कारवाई करावी, अशी त्या भागातील रहिवाशांची मागणी आहे.
रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांचा आज, दि. २२ रोजी दौरा आहे. ज्या भागात लाहोटी जातील, फक्त तोच भाग रेल्वे प्रशासनातर्फे चकाचक करण्यात आला आहे, तर या पुलाचे काम का करण्यात आले नाही, असेही बोलले जात आहे.
लवकरच त्या पुलाचे दुरुस्तीचे आदेश रेल्वे कर्मचाऱ्यांना देतो. दुरुस्ती लवकर करण्यात येईल. या कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करू.
-नवीन पाटील, एडीआरएम, भुसावळ