लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये आलेल्या सुस्तपणामुळे अनेक कामांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कामांमुळे नगरसेवक व नागरिकांकडून मनपा प्रशासनाला टार्गेट केले जात आहे. यामुळे मनपातील प्रशासकीय कामांची गती वाढवण्यासाठी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन, यंत्रणेतील ढिसाळपणा सोडून आपला कामांमध्ये गती आणण्याचा ‘बूस्टर डोस’ आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांना दिला आहे.
गुरुवारी मनपा आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक आयुक्तांच्या दालनात बोलावली होती. या बैठकीत लोकप्रतिनिधींकडून महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत करण्यात येत असलेल्या तक्रारींबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये मनपा आयुक्तांनीदेखील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, कामात सुधारणा करण्याच्या सूचना सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत. एखाद्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने कामात कुचराई केल्यामुळे याचा फटका सर्व प्रशासनाला बसत असल्याचेदेखील आयुक्तांनी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुनावले.
प्रत्येक महिन्यात दोन वेळा घेतला जाईल विविध विभागांचा आढावा
मनपा आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना कामाची गती वाढविण्यासोबतच कामात पारदर्शकपणा व तत्परता आणण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच महिन्यात दोन वेळा एक-एक विभागाचा आढावा घेण्यात येणार असल्याची सूचना मनपा आयुक्तांनी या बैठकीत दिली. तसेच कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील कारवाईचा सामना करावा लागेल असे मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी संबंधित विभागांना सांगितले आहे.
या विषयावर घेतला जाणार आढावा.
१) महासभा व स्थायी समिती यांच्या ठरावांची अंमलबजावणी करणे,
२) मनपा अर्थसंकल्पातील विविध तरतुदींप्रमाणे प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा आढावा घेणे.
३) वेगवेगळ्या शासन अनुदानित योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे नियोजन व अंमलबजावणी करणे.
४) न्यायालयीन प्रकरणे
५) शासन स्तरावरील विविध प्रकरणे
६) प्रशासकीय कामाबाबतची वर्कशीट
७) प्रलंबित लेखा परीक्षण आक्षेप.
‘या’ दिवशी ‘या’ विभागाचा घेतला जाणार आढावा
१. पहिला व तिसरा सोमवारी - कर आकारणी व संकलन विभाग
२. दुसऱ्या व चौथ्या सोमवारी -आस्थापना व भांडार विभाग
३ पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी- प्रकल्प विभाग
४. दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी - पाणी पुरवठा व विद्युत विभाग
५ पहिल्या व तिसऱ्या बुधवारी- सार्वजनिक बांधकाम विभाग
६. दुसऱ्या व चौथ्या बुधवारी - पाणीपुरवठा व विद्युत विभाग
७ पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी - आरोग्य व घनकचरा विभाग
८ दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी - मालमत्ता व्यवस्थापन विभाग
९. पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी - नगररचना व अतिक्रमण विभाग
१० दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी - महिला व बालकल्याण तसेच दिव्यांग कल्याण व अग्निशमन विभाग आणि एनयूएल एम विभाग