घरगुती गॅस सिलिंडरसह व्यावसायिक सिलिंडरचे दरही दिवसेंदिवस वाढत असून, आता हे दर एक हजार ७२३ रुपयांवर पोहोचले आहेत. वाढत्या दरामुळे व्यावसायिकांनाही महागाईची झळ चांगलीच सहन करावी लागत आहे. जानेवारी २०२१पासून ते सप्टेंबरपर्यंत या सिलिंडरच्या दरात ३५९.५० रुपयांनी वाढ झाली आहे. जानेवारी २०२१मध्ये १,३६४.५० रुपयांवर असलेले दर फेब्रुवारीमध्ये १,५३५.५० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर वाढत-वाढत जाऊन हे दर आता एक हजार ७२३वर पोहोचले आहेत.
महिन्याचे गणित कोलमडले
दर महिन्याला वाढत जाणारे गॅस सिलिंडरचे दर महागाईत आणखी भर घालत आहेत. हे भाव वाढलेले असले तरी शहरात चूल कशी पेटवावी, हा प्रश्न आहे. पाणी तापविण्यापासून सर्वच कामांना गॅस वापरावा लागतो. सरकारने लवकरात लवकर गॅसचे दर कमी करावेत.
- कोमल जैन, गृहिणी
गॅस सिलिंडर आता ८९० रुपयांना मिळत आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. सर्वच ठिकाणी भाववाढ होत असल्याने करायचे काय? गॅसचे दर वाढले तरी सबसिडी मात्र मिळत नाही. या वाढत्या दरावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे.
- मेघा जाधव, गृहिणी