१७ केंद्रांवर होणार नोंदणी : ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासनाकडून लवकरच ज्वारी, मका व बाजरी या भरडधान्य खरेदीस सुरुवात होणार असून, यासाठी जिल्ह्यातील १७ केंद्रांवर नोंदणी प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात करण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी.एन.मगर यांनी दिली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार असून, त्यानंतर पुढील महिन्यात खरेदी केंद्रांना सुरुवात केली जाणार आहे.
नोंदणी प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या चालू खात्याचे पासबुक, आधार कार्ड व शेताचा सातबारा ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. गेल्या वेळेस अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे बंद खात्याचे पासबुक दिल्याने रक्कम द्यायला अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. १५ तालुक्यांसह जळगाव तालुक्यात २ अशा एकूण १७ केंद्रांवर ही ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया करावी लागणार आहे.
नोंदणी करतो, मात्र खरेदीची शाश्वती द्या
गेल्या वर्षीही शासकीय खरेदी केंद्रावर भरडधान्य खरेदी करण्याबाबत नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, नोंदणी झाल्यानंतरही उद्दिष्टाचे कारण देऊन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा मालही खरेदी करण्यात आलेला नव्हता. तब्बल ११ हजार शेतकऱ्यांचा माल त्यावेळी खरेदी करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रावर नोंदणी करतो. मात्र, खरेदीची शाश्वती द्या, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.