जळगाव : एका कंपनीतील प्रतिनिधी असल्याचे सांगून एका ठगाने मनीष जगदीश जाधवानी (रा. एमजी रोड, जळगाव) या व्यापाऱ्याची २४ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
व्यावसायिक मनीष जाधवानी हे एमजी रोड परिसरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. १४ जून रोजी त्यांनी ऑनलाइन शॉपिंग ॲपवरून सीपी प्लस कंपनीचे बुलेट सीसीटीव्ही कॅमेरे बुक केले होते. या कॅमेऱ्यांच्या वॉरंटीची माहिती मिळावी यासाठी त्यांनी गुरुवारी दुपारी सीपी प्लस कंपनीच्या कस्टमर केअरला संपर्क साधला होता; मात्र तो होऊ शकला नाही. काही वेळानंतर त्यांना एका मोबाइल क्रमांकावरून फोन आला व आपण सीपी प्लस कंपनीतील प्रतिनिधी असल्याचे सांगून जाधवानी यांची समस्या जाणून घेतली. नंतर त्यांना एनी डेस्क रिमोट कंट्रोल अॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्यावर कॅमेऱ्याची वॉरंटी कळू शकेल अशी माहिती दिली. त्यासाठी १० रुपये चार्ज लागेल, असेही त्या प्रतिनिधीने सांगितले; मात्र काही वेळानंतर जाधवानी यांना त्यांच्या बँक खात्यातून अचानक २४ हजार १०० रुपयांची रक्कम दुसऱ्या बँक खात्यात वर्ग झाल्याचा एसएमएस प्राप्त झाला. त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर शुक्रवारी त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठत संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली व तक्रार दाखल केली आहे.