हंगामातील सर्वात जास्त पावसाची नोंद; रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावारे बाबांनो..; चिखलात वाहन चालविणे झाले कठीण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यावर्षी जून महिन्यात मान्सूनचे वेळेवर आगमन होऊनदेखील जिल्ह्यासह शहरात पावसाने तशी जोरदार हजेरी लावलेली नव्हती. त्यातच जुलै महिन्यात शहराचा पारा ४० अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकदेखील प्रचंड उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहर व तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावत एकाच रात्री शहरात तब्बल २५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या हंगामात एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून, या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
यंदा जून व जुलै महिन्यातदेखील समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरीदेखील हवालदिल झाले होते. त्यात तापमानातदेखील वाढ होत असल्याने भरपावसाळ्यात नागरिकांना उन्हाळ्याचाच भास जाणवत होता. मंगळवारी संपूर्ण दिवस नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, रात्री १० वाजेनंतर वातावरणात बदल होऊन सुमारे २० किमी वेगाने वारे वाहत असल्याने उकाडादेखील कमी झाला. त्यानंतर रात्री ११ वाजेनंतर विजांचा कडकडाटासह शहर व तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा वेग इतका प्रचंड होता की, अवघ्या दहा मिनिटातच गटारी ओव्हरफ्लो झाल्या व रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहू लागले होते.
तब्बल १ तास धो धो कोसळला पाऊस
शहरात या दोन महिन्यात अनेकवेळा पाऊस झाला. मात्र, १० ते १५ मिनिटांच्यावर पावसाने हजेरी लावलेली नव्हती. मात्र, मंगळवारी रात्री झालेला पाऊस सलग १ तास त्याच वेगाने धो धो कोसळत राहिला. यामुळे शहरातील बजरंग बोगदा, कोर्ट चौक, नवी पेठ, भोईटे शाळा परिसर, पिंप्राळा रेल्वे गेट, प्रभुदेसाई कॉलनी, शनिपेठ परिसर या भागातील रस्त्यांवरदेखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच लहान व मोठ्या नाल्यांनादेखील पूर आल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते. ममुराबाद रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मात्र, रात्रीच्या वेळेस या रस्त्यांवरून फारशी वर्दळ नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला नाही.
रस्त्यांवर चिखल साचल्याने वाहनधारक त्रस्त
पावसानंतर शहरातील रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनपा प्रशासनाने पावसाळ्याआधी रस्त्यांची दुरुस्ती केली नसल्याने मंगळवारी झालेल्या पावसानंतर शहरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना वाहने चालविताना चांगलीच कसरत करावी लागली. केसी पार्क, एसएमआयटी परिसरातील मुख्य रस्ता, शाहू नगरातील रस्ता, शनिपेठ या भागात तर रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता की, पायी चालणेदेखील कठीण झाले होते.
पावसाने पिकांना फायदा
मंगळवारी झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, कोरडवाहू कापसासोबतच बागायती कापसालादेखील या पावसामुळे लाभ झाला आहे. उडीद, मूग व सोयाबीनच्या पिकांना या पावसामुळे फायदा झाला आहे. एकाच रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जळगाव तालुक्यातील अनेक शेतांमध्ये पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
असा झाला पाऊस
जळगाव शहर - २५ मिमी
आव्हाणे, कानळदा परिसर - २९ मिमी
शिरसोली, जैन हिल्स परिसर - २६ मिमी
ममुराबाद, आसोदा परिसर - २१ मिमी
बांभोरी, पाळधी परिसर - २४ मिमी
नशिराबाद परिसर- १९ मिमी