गेल्या २० सप्टेंबर रोजी कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन बारामती ॲग्रोकडे सुरुवातीची पंधरा वर्षे कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिला गेला आणि काही कामगारांना कामावर घेतले गेले. प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली असल्याने कामगारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
भाडेतत्त्वावर का असेना परंतु कारखाना सुरू होणार हे मात्र तालुक्यातील मोठे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र आहे. परिसरातील हजारो कामगारांना कारखाना सुरू झाल्यानंतर रोजगार उपलब्ध होणार आहे.
अडीच हजार मेट्रिक टन गाळप क्षमता
येथील सहकारी साखर कारखान्यांची प्रतिदिवस अडीच हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्याची क्षमता आहे. तीन पाळ्यांमध्ये नियमित कारखाना सुरू राहिला तर दररोज अडीच हजार मेट्रिक टन ऊस गाळप होऊ शकते. तसेच सहवीज प्रकल्पातून दररोज शेकडो युनिट वीज निर्माण होते. गेल्या काही वर्षांपूर्वी कारखान्यातील सहवीज प्रकल्पातून निर्माण झालेली वीज महावितरण कंपनीला विकून कारखान्याला पैसेही मिळायचे आणि कारखान्याने वापरलेल्या विजेचे बिल फेडून कारखान्याला पैसे मिळायचे. परिसरातही उसासाठी पोषक वातावरण असल्याने गेल्या काही वर्षांपूर्वी कारखान्याने पाच ते सहा लाख टन ऊस एका हंगामात गाळप केलेला आहे.
हजारो हातांना काम
साखर कारखान्यात नियमित वेतन श्रेणीवर जवळपास दोनशे ते सव्वादोनशे कामगार कामास आहे. तसेच ऊस वाहतूक व ऊस तोडणी मजुरांपासून तर कारखाना सुरू झाल्यानंतर लहान मोठे उद्योग व्यवसाय करणारे असे एकूण जवळपास एक हजाराच्या वर बेरोजगारांना दररोज रोजगार उपलब्ध होईल.
भाग भांडवलदार सभासदांना लाभ मिळणे आवश्यक
चोपडा सहकारी साखर कारखान्यात जवळपास ३५ हजार शेतकऱ्यांनी भाग भांडवल अडकविले आहे. भाग भांडवलदारांना सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या प्रकल्पातून मिळणारे लाभ दिले जाणेही आवश्यक आहे. यापूर्वी याच कारखान्याने भाग भांडवलदार सभासद शेतकऱ्यांना कमी दरात साखर उपलब्ध करून दिलेली आहे, तर अनेक वेळा भेटवस्तूही दिल्या आहेत. म्हणून सहकारी तत्त्वावर चालवले जाणारे प्रकल्पांचे लाभ सभासदांना यापुढेही मिळावेत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.