मीटर तपासणी मोहीम : महावितरणने शहरात आतापर्यंत २५ जणांवर केली कारवाई
जळगाव : महावितरण प्रशासनाने गेल्या आठवड्यापासून वीजमीटर तपासणी मोहीम सुरू केली असून, मीटरमध्ये फेरफार आढळल्यास थेट वीजपुरवठा खंडित करून, मीटर जप्त करण्यात येत आहेत. त्यानुसार, महावितरणने शहरात आतापर्यंत २५ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
महावितरण प्रशासनातर्फे ज्या ग्राहकांना महिन्याला सरासरी ३० ते ३५ पर्यंतच्या रीडिंगनुसार वीजबिल येेते. अशा ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, महावितरण प्रशासनाने प्रत्येक ग्राहकांचे मीटर तपासण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत महावितरणच्या तपासणी पथकाने मेहरूण, आदर्शनगर, सिंधी कॉलनी व सुप्रीम कॉलनीतील वीजमीटर्सची तपासणी केली. ‘टॉग टेस्टर’च्या साहाय्याने मीटर्सची तपासणी करण्यात येत असून, या तपासणीत सुमारे २५ नागरिकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले आहे. या सर्व नागरिकांचे मीटर महावितरणने जप्त केले आहेत. विशेष म्हणजे मीटर तपासणीसाठी महावितरण प्रशासनाने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
इन्फो :
मीटरजप्ती आणि ५० हजारांपर्यंत दंड
- महावितरणच्या पथकाला ज्या ग्राहकांंनी मीटरमध्ये फेरफार करून, विजेची चोरी करत असल्याचे आढळून आले आहे, अशा ग्राहकांचे मागील वीजबिल तपासून त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये वेगवेगळ्या ग्राहकांना साधारणत: १० हजारांपासून ते ५० हजारांपर्यंत दंड ठोठावला आहे.
- तसेच या दंडाची रक्कम भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे. जर तीन दिवसांत संबंधित ग्राहकाने दंडाची रक्कम भरली नाही, तर त्या ग्राहकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच दंड भरल्यानंतर त्या ग्राहकाच्या घरी नवीन वीजमीटर जोडण्यात येणार आहे.
इन्फो :
कधीही होऊ शकते मीटरची तपासणी
- महावितरण प्रशासनाने मीटर तपासणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक नियुक्त केले आहे. हे पथक दररोज वेगवेगळ्या भागात कारवाई करत आहे. विशेष म्हणजे हे पथक संबंधित ग्राहकाला कुठलीही नोटीस न देता कारवाईसाठी जात आहे.
-गेल्या काही वर्षांत ज्या भागात सर्वाधिक वीजचोरीचे प्रकार आढळून आले आहेत, अशा भागात मीटर तपासणीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे.
- मीटरची तपासणी करताना ज्या ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आल्यास, त्या ग्राहकाचे मागील रीडिंग, आलेले वीजबिल यांची तपासणी करून, वीजचोरीचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच हा दंड आकारताना संबंधित ग्राहकाच्या घरातील वस्तूंचीही पाहणी करण्यात येत आहे.
इन्फो :
विजेची चोरी करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीजचोरी करू नये. जे ग्राहक वीजचोरी करताना आढळून येत आहेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दंड नाही भरला तर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
-फारूख शेख, अधीक्षक अभियंता तथा मुख्य प्रभारी अभियंता, जळगाव परिमंडळ
इन्फो :
वीजमीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
२०१९ :
२०२० :
२०२१ :