लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सुप्रिम कॉलनी भागातील गीतांजली कंपनीजवळ चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या तरुणाला गुरुवारी मध्यरात्री दीड वाजता एमआयडीसी पोलिसांनी पकडले. ऋषिकेश किशोर विजयवारी (२२ रा. नितीन साहित्या नगर, सुप्रिम कॉलनी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी रात्री सुप्रीम कॉलनीजवळील गीतांजली केमिकल कंपनीजवळ पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील विनोद बोरसे, हेमंत कळसकर, साईनाथ मुंढे आणि सतीष गर्जे हे पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. दीड वाजताच्या सुमारास सत्यांना एक तरुण तोंडाला रूमाल बांधून संशयितरित्या फिरताना आढळून आला. पोलीस त्याच्याजवळ येताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर ऋषिकेश किशोर विजयवारी असे नाव त्याने पोलिसांना सांगितले. परिसरात कोणत्या कारणासाठी फिरत आहे, असे विचारल्यानंतर त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. परंतु, तो रात्री घरफोडी किंवा चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सतीश गर्जे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.