मुक्ताईनगर : भोई वाडा परिसरात गावठी पिस्तूल बाळणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. रविवारी ही कारवाई करण्यात आली.
शहरातील भोईवाडा परिसरात एक २५ वर्षीय युवक गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती ५ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना मिळताच निरीक्षक खताळ यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, हवालदार संतोष नागरे, देवीसिंग तायडे, गोपीचंद सोनवणे, नितीन चौधरी, कांतीलाल केदारे, रवींद्र मेढे, मंगल साळुंके यांनी शहरातील संत मुक्ताबाई महाविद्यालयाचे मागील बाजूस असलेल्या भोईवाड्यात जात भिंतीच्या आडोशाला लपून बसलेल्या युवकास आवाज देताच तो पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. नंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी लोखंडी पिस्तूल मिळून आले. गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याचे नाव रवी उर्फ माया महादेव तायडे रा.मुक्ताईनगर असे आहे. पो. काॅ. सचिन जाधव यांच्या फिर्यादीवरुन रवी तायडेविरुद्ध आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.