लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : साइडला चालता येत नाही का? असे म्हणत दुचाकीवरील तिघांनी मेव्हणा-शालकाला मारहाण केली. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास फुले मार्केट परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोशीपेठ येथे अलताफ रशीद खाटीक कुटुंबासह वास्तव्यास आहेत. गुरूवारी दुपारी ते शालक शाकीब याच्यासह चप्पल खरेदी करण्यासाठी फुले मार्केट परिसरात आले होते. दुपारी ४ वाजता चप्पल खरेदी केल्यानंतर दोघं फुले मार्केट परिसरातीले मुंदडा ट्रेडर्स दुकानाजवळून पायी जात होते. त्यावेळी मागून दुचाकीवरून तीन जण आले त्यातील एकाने साइडला चालता येत नाही का, असा अलताफ यांना बोलला. त्यावर तुला जागा दिसत नाही का असे प्रतिउत्तर मिळाल्यानंतर तिघांनी अलताफ व त्यांचा शालक शाकीब यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने बाजूला पडलेली फरशी अलताफ यांच्या हाताला मारली. नंतर त्यांच्या पिशवीतील डबा काढून डोक्यात मारला. त्यानंतर तिघे तेथून पसार झाले. डोक्यात डबा मारल्यामुळे अलताफ हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचार घेतला. अखेर रात्री त्यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.